मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अंधेरी पश्चिम, डी. एन. नगर-मंडाले ‘मेट्रो-२ ब’चे काम हाती घेतले आहे. या मार्गिकेतील डायमंड गार्डनर-मानखुर्द हा पहिला टप्पा या वर्षाच्या अखेर सेवेत दाखल करण्याचे नियोजन आहे. मात्र कंत्राटदारांच्या हलगर्जीमुळे पहिल्या टप्प्याच्या कामास प्रचंड विलंब होत आहे. याची दखल घेत ‘एमएमआरडीए’ने दोन्ही कंत्राटदारांना एकूण १ कोटी २९ लाख रुपये दंड ठोठावला आहे.

‘दहिसर-अंधेरी पश्चिम, डी. एन. नगर मेट्रो-२ अ’चा विस्तार ‘डी. एन. नगर-मंडाले असा २-ब’ मार्गिकेच्या माध्यमातून केला जात आहे. २३.६ किमीच्या आणि १९ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या ‘मेट्रो-२ ब’चे काम सध्या ‘एमएमआरडीए’कडून सुरू आहे. या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत सुरू असून चेंबूरमधील डायमंड गार्डनर-मंडाले दरम्यान ५.५ किमी लांबीचा आणि पाच स्थानकांचा समावेश असलेला पहिला टप्पा या वर्षाअखेर सेवेत दाखल करण्याचे नियोजन आहे.

कामाला वेग देण्याचे निर्देश मे. एनसीसी आणि जे. कुमार या कंत्राटदार कंपन्यांना दिले होते. मात्र कामात विलंब निर्दशनास आल्याने ‘एमएमआरडीए’ने दोन्ही कंत्राटदारांविरोधात दंडात्मक कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे जे. कुमार कंपनीवर यापूर्वीही अनेकदा कामात हलगर्जीचा ठपका ठेऊन दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकाम आणि ‘फिनिशिंग’च्या कामाचे वेळापत्रक या दोन कंत्राटदारांमुळे मागे पडल्याबद्दल ‘एमएमआरडीए’ने दंडात्मक कारवाई केली आहे.

जे. कुमार कंपनी वादात?

जे. कुमार कंपनीविरोधात एमएमआरडीए आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) अनेकदा दंडात्मक कारवाई केली आहे. ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील पियर आणि पियर कॅप्सच्या उभारणीचे काम वेळेत पूर्ण न केल्याबद्दल ऑक्टोबर २०२४ मध्ये ‘एमएमआरडीए’ने या कंपनीला ४६ लाख रुपये दंड ठोठावला होता. तर ‘दहिसर-मिरा-भाईंदर मेट्रो-९’ मार्गिकेत एका मोठ्या अपघातप्रकरणीही एमएमआरडीएने या कंपनीला ३० लाख रुपये दंड केला होता. तर ‘मेट्रो-३’ मार्गिकेतील आरे-बीकेसी टप्प्याची चाचणी सुरू असताना मार्गिकेत पाणी शिरल्याप्रकरणी ‘एमएमआरसी’ने या कंपनीला दोन कोटी रुपये दंड ठोठवला होता. आतापर्यंत या कंपनीला सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

कारवाईस कारण की…

●पहिल्या टप्प्यातील उन्नत मेट्रो मार्गिकेपैकी मोठा भाग पूर्ण करण्याचे काम २०१९ मध्ये मे. एनसीसी लिमिटेड कंपनीला देण्यात आले आहे. हे काम ४५८ कोटी ९३ लाख रुपयांचे आहे. हे काम वेळेत काम पूर्ण न झाल्याने कंत्राटदाराचा करार जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आला आहे. या मुदतवाढीदरम्यान कामास वेगे देणे गरजेचे असताना या कंत्राटदाराकडून कामास विलंब झाला आहे. त्यामुळे या कंत्राटदाराला एक कोटी ७ लाख रुपये दंड ठोठावल्याची माहिती सूत्रांनी दिली. ●पहिल्या टप्प्यातील पाच मेट्रो स्थानकांवरील छताच्या कामासह इतर कामांची जबाबदारी जे. कुमार कंपनीवर आहे. या कंपनीकडूनही कामाला विलंब झाला आहे. त्यामुळे हलगर्जीचा ठपका ठेवत जे. कुमार कंपनीला २१ लाख ९७ हजार रुपये दंड ठोठावला आहे. दरम्यान, जे. कुमारला देण्यात आलेले कंत्राट ९९ कोटी ३० लाख रुपयांचे असून, हे काम या कंपनीस ऑक्टोबर २०२२ मध्ये देण्यात आले होते. यासंबंधीचा करार २०२५ पर्यंत आहे.