मुंबई : ‘दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेवरील सर्व मेट्रो स्थानकांमध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाकडून (एमएमएमओसीएल) स्वच्छ प्रसाधनगृह उपलब्ध करण्यात आली आहेत. असे असले तरी या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबाबत वा सुविधांबाबत प्रवाशांच्या सूचना, तक्रारी जाणून घेऊन त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्याचा निर्णय एमएमएमओसीएलने घेतला आहे. महिला प्रवाशांना सुविधांयुक्त स्वच्छ प्रसाधनगृह उपलब्ध करण्यासाठी एमएमएमओसीएल प्राधान्य देणार आहे. या पार्श्वभूमीवर एमएमएमओसीएलने शौचालय सेवा ॲप कार्यान्वित केले आहे. या ॲपवर प्रवाशांना आपल्या सूचना वा तक्रारी नोंदवून तात्काळ सुधारणा करून घेता येणार आहे.
‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलकडून वेळोवेळी आवश्यक ते बदल वा नवीन सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. प्रवाशांना रांगेत उभे राहवे लागू नये याकरिता व्हॉटस अॅप तिकिट सेवेसह विविध सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. आता प्रवाशांना मेट्रो प्रवासादरम्यान स्वच्छ, चकाचक प्रसाधनगृह उपलब्ध करण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. एमएमएमओसीएलकडून टॉयलेट सेवा नावाने एक अॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. मेट्रो स्थानकावरील क्युआर कोड स्कॅन करून टॉयलेट सेवा ॲप डाऊनलोड करता येणार आहे. तर ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांवरील ३० मेट्रो स्थानकांमधील प्रसाधनगृह अस्वच्छ असेल, पाणी नसेल, पुरेसे पाणी नसेल वा इतर कोणत्याही तक्रारी असतील तर त्या प्रवाशांना या ॲपवर नोंदवता येतील, अशी माहिती एमएमएमओसीएलकडून देण्यात आली. या तक्रारींची तात्काळ नोंद घेत स्वच्छ प्रसाधनगृह उपलब्ध करण्यात येणार आहे.
मागणीनुसार उपलब्धता
महिला, पुरुष प्रवाशांच्या तक्रारींसोबतच काही सूचना असतील तर त्याचीही नोंद या अॅपद्वारे तात्काळ घेतली जाणार आहे. काही मेट्रो स्थानकांत सॅनिटरी नॅपकीन वेंडींग यंत्राची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र काही स्थानकांवरील प्रसाधनगृहात ही सुविधा उपलब्ध नाही. त्यासाठी अॅपवर मागणी केल्यास ही सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. महिलांच्या दृष्टीने आवश्यक त्या इतर सुविधांही मागणीनुसार उपलब्ध करण्यात येणार आहेत, असेही एमएमएमओसीएलकडून सांगण्यात आले.