मुंबई : चेंबूर – मरीन ड्राईव्ह प्रवास अतिजलद करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्हदरम्यान दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला असून या बोगद्यासाठी ऑरेंज गेट येथे लाॅन्चिंग शाफ्ट बांधण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामासाठी ऑरेंज गेट येथील आवश्यक जागेपैकी ५० टक्के जागा एमएमआरडीएला उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या कामाला वेग आला असून या प्रकल्पातील भुयारीकरणाला सप्टेंबरपासून सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यानुसार कंत्राटदार एल. ॲण्ड टी. ‘मावळा’ नावाचे टीबीएम यंत्र सज्ज करीत आहे. हे टीबीएम यंत्र भूगर्भात सोडून सप्टेंबरपासून भुयारीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.

एमएमआरडीएने चेंबूर – सीएसएमटी प्रवास अतिजलद करण्यासाठी १६.८ किमीचा पूर्वमूक्त मार्ग बांधला असून हा मार्ग २०१३ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या पूर्वमुक्त मार्गामुळे चेंबूर – सीएसएमटी अंतर २० ते २५ मिनिटांत पार करता येत आहे. मात्र चेंबूरहून सीएसएमटीपर्यंत अतिवेगाने आल्यानंतर मरीन ड्राईव्ह, चर्चगेटकडे जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. वाहतूक कोंडीचा हा प्रश्न सोडविण्यासाठी, चेंबूर ते मरीन ड्राईव्ह असा थेट प्रवास अतिवेगवान करण्यासाठी एमएमआरडीएने ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्प हाती घेतला आहे. ९.२ किमी लांबीच्या या दुहेरी बोगद्यासाठी ९१५८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा बोगदा मुंबई सागरी किनारा मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे दुहेरी बोगद्यावरून येणाऱ्या वाहनांना पुढे पश्चिम उपनगरांकडे जाणेही सोपे होणार आहे. या बोगद्याच्या बांधकामाची निविदा एमएमआरडीएकडून अंतिम करण्यात आली असून प्रकल्पाचे कंत्राट एल. ॲण्ड टी. कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पाचेही भूमिपूजन करण्यात आले आहे. दरम्यान, ऑरेंज गेट येथे लाॅन्चिंग शाफ्ट बांधण्यासाठी एमएमआरडीएला मुंबई बंदर प्राधिकरणाची ४.३ हेक्टर जागा आवश्यक आहे. यापैकी १.९६ हेक्टर जागा कायमस्वरुपी प्रकल्पासाठी आवश्यक आहे. या जागेसाठी एमएमआरडीएला अंदाजे ८५०० कोटी रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. ही जागा मिळावी यासाठी मागील कित्येक महिन्यांपासून एमएमआरडीए प्रयत्नशील आहे. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून आतापर्यंत ५० टक्के जागा ताब्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.

सुरुवातीला मुंबई बंदर प्राधिकरणाकडून एक हेक्टर जागा ताब्यात आली होती. त्यावर लाॅन्चिंग शाफ्टचे काम सुरू करण्यात आले होते. आता ५० टक्के जागा मिळाल्याने कामाने वेग घेतला आहे. उर्वरित ५० टक्के जागा लवकरच मिळेल, अशी आशा एमएमआरडीएला आहे. लाॅन्चिंग शाफ्टचे काम वेगात सुरू असून दुसरीकडे मावळा टीबीएमची आवश्यक ती दुरुस्ती करून ते भुयारीकरणासाठी सज्ज केला जात आहे. त्यानुसार लवकरच मावळा भुगर्भात सोडून सप्टेंबरपासून भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन असल्याचेही सूत्रांनी सांगितले. एकूणच आता ऑरेंज गेट – मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगद्याचे कामही वेग घेणार असून भूयारीकरणाचा महत्त्वाचा टप्पा आता लवकरच मार्गी लागणार आहे.

सागरी किनारा मार्गातील मावळा

मुंबई महानगर पालिकेच्या सागरी किनारा मार्गाचे बांधकाम एल. ॲण्ड टी, कंपनीकडून करण्यात आले आहे. या प्रकल्पात बोगद्यांचाही समावेश असून या बोगद्याच्या कामासाठी एल. ॲण्ड टी.ने मावळा नावाच्या टीबीएमचा वापर केला होता. १२.१९ मीटर व्यासाच्या या मावळा टीबीएमचा वापर आता एल. ॲण्ड टी. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या भूयारीकरणासाठी करणार आहे. त्यानुसार मावळ्याची आवश्यक ती दुरुस्ती सुरू असून लवकरच मावळा सज्ज होईल आणि भूगर्भात जाईल, असेही सूत्रांनी सांगितले. तर त्याचवेळी या प्रकल्पासाठी दोन टीबीएमची गरज भासणार आहे. दुसरा टीबीएम परदेशात तयार करून घेतला जात आहे. हे टीबीएम केव्हा मुंबईत दाखल होईल याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. मात्र आता मावळ्याच्या माध्यमातून भूयारीकरणास लवकरच सुरुवात होणार आहे.

Story img Loader