चेंबूर ते संत गाडगे महाराज मोनोरेल प्रकल्पातील प्रवासी संख्या वाढविण्यासाठी मोनोरेल, मेट्रो ३ आणि उपनगरीय रेल्वेशी जोडण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे.संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेतील महालक्ष्मी स्थानक तसेच महालक्ष्मी रेल्वे स्थानकाशी पादचारी पुलासह ‘ट्रॅव्हलेटर’ अर्थात सरकत्या मार्गाने जोडण्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागविल्या आहेत. सल्लागारासह बांधकाम कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी या निविदा मागविण्यात आल्या आहेत.
हेही वाचा >>>बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ‘शिवतीर्था’वर, राज ठाकरेंबरोबरचा फोटो व्हायरल
देशातील पहिला आणि एकमेव असा चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक प्रकल्प फारसा यशस्वी झालेला नाही. एमएमआरडीएसाठी हा प्रकल्प पांढरा हत्ती ठरला आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएने मोनो मार्गिका मेट्रो आणि रेल्वेशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मोनोरेल स्थानके चार रेल्वे स्थानकांसह एका मेट्रो स्थानकाशी जोडण्यात येणार आहे. या कामासाठी आलेल्या निविदेनुसार ६३ कोटी ६८ लाख रुपये असा खर्च अपेक्षित आहे. ३२५ मीटर लांबीचा पादचारी पूल उभा करून त्यावर २६५ मीटर लांबीचा आणि ७ मीटर रुंदीचा ट्रॅव्हलेटर अर्थात सरकता मार्ग बांधण्यात येणार आहे. आठ ट्रॅव्हलेटर बांधण्याचे उद्दिष्ट असून तेथे चार उदवाहन असतील.
हेही वाचा >>>संजय बांगर यांची पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ? ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही…”
पहिल्या टप्प्यात महालक्ष्मी रेल्वे स्थानक आणि महालक्ष्मी मेट्रो ३ स्थानकाशी मोनो जोडल्यानंतर पुढे चेंबूर, वडाळा आणि करी रोड रेल्वे स्थानकाशी मोनो स्थानके जोडली जाणार आहेत. ही सर्व कामे पूर्ण झाल्यानंतर मोनो प्रकल्पातील प्रवासी संख्या वाढून प्रकल्प आर्थिक अडचणीतून बाहेर येण्याची आशा आहे.
तीन महिन्यांत कामाला सुरूवात
निविदा अंतिम करून तीन महिन्यांत कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली. काम सुरू झाल्यापासून एका वर्षात काम पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.