मुंबई : ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) आनंद नगर ते साकेत उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या  प्रकल्पाच्या बांधकामासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरच कंत्राट अंतिम करून बांधकामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यामुळे आता बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यासाठी नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Snehalata Deshmukh: मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु स्नेहलता देशमुख यांचं निधन, ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पूर्व द्रुतगती मार्गावरून ठाण्यात येणाऱ्या आणि पुढे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे ठाण्यात मोठी वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून एमएमआरडीएने आंनद नगर – साकेत उन्नत रस्ता प्रकल्प योजला आहे. त्यासाठी अंदाजे १६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा रस्ता ६.३० किमी लांबीचा आणि सहा (येण्यासाठी तीन, जाण्यासाठी तीन) मार्गिकेचा आहे. त्या प्रकल्पाच्या बांधकामाचा आराखडा अंतिम करत मार्चमध्ये बांधकामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नुकत्याच तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या असून तीन निविदा सादर झाल्या आहेत. अशोका बिल्डकॉन, जे कुमार इन्फ्रा आणि नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी अशा तीन कंपनीच्या या निविदा आहेत. सध्या या निविदांची छाननी सुरू असून लवकरच आर्थिक निविदा खुल्या जाणार आहेत. त्यानंतर निविदा अंतिम करून बांधकामाचे कंत्राट दिले जाणार आहे. एकूणच शक्य तितक्या लवकर बांधकाम सुरू करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. या अनुषंगाने बांधकामाचे व्यवस्थापन करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची गरज एमएमआरडीएला आहे. त्यामुळे त्यासाठी नुकतीच एमएमआरडीएने निविदा प्रसिद्ध केली आहे. बांधकाम सुरू होण्यापूर्वी सल्लागाराची नियुक्ती करणे आवश्यक आहे. त्यानुसार एक -दीड महिन्यात ही नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda decided to construct an elevated road from thane anand nagar to saket mumbai print news zws