मुंबई…मिरा-भाईंदरमधील ४७ रस्त्यांचे सुधारीकरण आणि काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. चार टप्प्यांमध्ये ही कामे केली जाणार असून या कामासाठी चार कंत्राटदारांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. हे रस्ते राष्ट्रीय महामार्ग ८ आणि मुख्य रस्त्यांशी जोडलेले असून या रस्त्यांचे सुधारीकरण झाल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असून प्रवास वेगवान होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये समस्यांचा शिवआरोग्य सेनेने वाचला पाढा

मिरा-भाईंदर शहराच्या हद्दीत डांबरी रस्ते असून यातील बर्याच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. तर वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेतला एमएमआरडीएने मिरा-भाईंदरमधील ४७ रस्त्यांच्या सुधारीकरणाचा तसेच काँक्रीटीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २१.८० किमीच्या ४७ रस्त्यांचे काँक्रीटीकरण करत रस्त्यांचे सुधारीकरण केले जाणार आहे. सध्या या ४७ रस्त्यांची ६ ते ४५ मीटर अशी आहे. एमएमआरडीएच्या प्रस्तावानुसार रस्त्यांचे काँकीटीकरण करत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला पर्जन्यजलवाहिन्यांसह रस्त्यांची कामे केली जातील. तर रस्त्यांच्या दोन्ही बाजूस पदचारी पथही असणार आहे. रस्ते सुधारीकरण आणि काँक्रीटीकरण प्रकल्पासाठी चार टप्प्यात एमएमआरडीएने निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार सप्टेंबरमध्ये झालेल्या प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत निविदा अंतिम करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्याचे काम एन. ए. कन्स्ट्रकशन प्रायव्हेट लिमटेडला, दुसर्या टप्प्याचे काम मे. गजानन कन्स्ट्रकशनला, तिसर्या टप्प्याचे काम मे. बिटकाँन इंडिया इन्फ्रास्टक्चर डेव्हलपर्सला तर चौथ्या टप्प्याचे काम मे. आर.ई. इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आले आहे. निविदा अंतिम झाल्याने आता लवकरच रस्त्यांच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर ही कामे झाल्यास मिरा-भाईंदरमधील वाहतूक कोंडी सुटण्याच मदत होणार असून प्रवास सुकर होणार असल्याचा दावा एमएमआरडीएने केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda decided to improve and concretizing 47 roads in mira bhayandar mumbai print news zws