मंगल हनवते,लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेचा खडकपाडा मार्गे उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण – खडकपाडा आणि खडकपाडा – उल्हासनगर अशी ७.७ किमीची विस्तारीत मार्गिका दोन टप्प्यात बांधण्यात येणार आहे. या मार्गिकेचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करावी लागणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव एमएमआरडीए प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मुंबई : संरक्षण आस्थापनांशेजारील पाच हजार गृहप्रकल्प अडचणीत? ‘नरेडको’चे आता केंद्र सरकारला साकडे

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणण्यात येत असून यापैकी सध्या काम सुरू असलेली एक मेट्रो मार्गिका म्हणजे ‘मेट्रो ५’. ही मार्गिका २४.९ किमी लांबीची असून यासाठी आठ हजार ४१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गिकेवर १७ मेट्रो स्थानकांचा समावेश असून या मार्गिकेमुळे ठाणे – कल्याण प्रवास अतिजलद होणार आहे. या मार्गिकेचे दोन टप्प्यात काम सुरू असून ठाणे – भिवंडी या पहिल्या टप्प्याचे फेब्रुवारीपर्यंत अंदाजे ७१ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर भिवंडी – कल्याण या दुसऱ्या टप्प्याचे काम येत्या काही दिवसात सुरू होणार आहे. आता या मार्गिकेचा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याला महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दुजोरा दिला आहे.

उल्हासनगर हे औद्योगिक शहर असून येथे दररोज मोठ्या संख्येने अवजड मालवाहू वाहने येतात. कपडे आणि फर्निचर खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक येथे येतात. त्यामुळे येथे लोकांची आणि वाहनांची गर्दी असते. ही बाब लक्षात घेऊन एमएमआरडीएने ‘मेट्रो ५’चा उल्हासनगरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. उल्हासनगरमधील लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा >>> मुंबई: नवी निवृत्ती योजना, १५ वर्षांनंतरही धोरण निश्चितीत अपयश

या निर्णयानुसार कल्याण – खडकपाडा आणि खडकपाडा – उल्हासनगर असा एकूण ७.७ किमी लांबीचा हा विस्तार आहे. या विस्तारित मेट्रो मार्गिकेचा बृहत आराखडा तयार करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती कारण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत मांडण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास उल्हासनगरपर्यंत मेट्रो नेण्यासाठीची पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

भविष्यात सीएसएमटी ते उल्हासनगर अतिजलद प्रवास एमएमआरडीए मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेश मेट्रोने जोडत आहे. ‘मेट्रो ५’चा उल्हासनगरपर्यंत विस्तार झाल्यास सीएसएमटी – उल्हासनगर असा मेट्रो प्रवास करता येणार असून हे अंतर अतिजलद पार करता येणार आहे. ‘वडाळा – सीएसएमटी मेट्रो ११’, ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’ या मार्गिका ‘मेट्रो ५’ आणि ‘मेट्रो ५’च्या विस्तारित मार्गिकेशी जोडल्या जाणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda extend thane bhiwandi kalyan metro 5 route upto ulhasnagar mumbai print news zws
Show comments