मुंबई : मुंबईत सध्या अंदाजे ५९ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे कार्यान्वित असून यात चार मेट्रो मार्गिकांचा समावेश आहे. येत्या डिसेंबरअखेर या मेट्रोच्या जाळ्यात २० किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकांची भर पडणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतलेल्या ‘अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब’ मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले असा ५.३ किमीचा पहिला टप्पा, ‘दहिसर पूर्व – मिरा-भाईंदर मेट्रो ९’मधील दहिसर पूर्व – काशीगाव असा ४.५ किमीचा पहिला टप्पा आणि ‘वडाळा – कासारवडवली मेट्रो ४’, तसेच ‘कासारवडवली – गायमूख मेट्रो ४ अ’मधील कॅडबरी जंक्शन – गायमुख असा १०.५ किमीचा पहिला टप्पा डिसेंबरअखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार तयारी सुरू असून महत्त्वाचे म्हणजे ‘मेट्रो ९’ आणि ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांतील कारशेडचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. त्यामुळे या मार्गिकांच्या पहिल्या टप्प्यासाठी पर्यायी कारशेडचा वापर केला जाणार आहे. मुंबईत नवीन मेट्रो मार्गिकांची भर पडणार असून ठाणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी एमएमआरडीएने ३३७ किमी लांबीचा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. सध्या ‘मेट्रो १’ (घाटकोपर – वर्सोवा), ‘मेट्रो २ अ’ (दहिसर – अंधेरी पश्चिम) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर – गुंदवली) अशा तीन मेट्रो मार्गिका सेवेत दाखल आहेत. मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (एमएमआरसी) ३२.५ किमी लांबीच्या ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी भुयारी मेट्रो मार्गिकाही काही महिन्यांपूर्वीच कार्यान्वित झाली. सध्या मुंबईत अंदाजे ५९ किमी लांबीच्या मार्गिकेवर मेट्रो धावत आहे. दुसरीकडे एमएमआरडीएकडून अनेक मार्गिकांची कामे सुरू आहेत. यापैकी ‘मेट्रो २ ब’, ‘मेट्रो ९’ आणि ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ची कामे वेगात सुरू आहेत. पण ‘मेट्रो ९’, ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांतील कारशेडच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. त्यामुळे कामे पूर्ण झालेल्या या मार्गिका सेवेत कशा दाखल करायच्या असा प्रश्न होता. दरम्यान, सध्या कामे सुरू असलेल्या कोणत्याही मार्गिका या वर्षात सुरू होण्याची शक्यता नव्हती. मात्र महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारशेड नसतानाही कोणत्या मेट्रो मार्गिका अंशतः सुरू करता येईल का असा मुद्दा उपस्थित केला. त्यानुसार एमएमआरडीएने अभ्यास केला आणि अखेर चार मार्गिका वाहतूक सेवेत अंशतः दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. एमएमआरडीएने आपल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात याचा समावेश केला असून आता डिसेंबरअखेरपर्यंत ‘मेट्रो २ ब’, ‘मेट्रो ९’ आणि ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांचा पहिल्या टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे निश्चित केल्याची माहिती एमएमआरडीएतील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मेट्रो ९’मधील दहिसर पूर्व – काशीगाव दरम्यानचा ४.५ किमी लांबीचा पहिला टप्पा, ‘मेट्रो २ ब’मधील डायमंड गार्डन – मंडाळे दरम्यानच्या ५.३ किमी लांबीचा टप्पा आणि ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’मधील कॅडबरी जंक्शन – गायमूख दरम्यानच्या १०.५ किमी लांबीचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील मंडाळे येथील कारशेडचे काम वेगात सुरू असून ही कारशेड येत्या काही महिन्यात पूर्ण होईल. त्यामुळे या मार्गिकेतील पहिला टप्पा सुरू करण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र ‘मेट्रो ९’मधील उत्तन आणि ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’च्या मोघरपाडा कारशेडच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेले नाही. त्यामुळे या तीन मार्गिकांतील पहिला टप्पा कार्यान्वित करण्यासाठी पर्यायी कारशेडचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. या निर्णयानुसार ‘मेट्रो ९’च्या पहिल्या टप्प्यासाठी ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ मार्गिकांच्या चारकोप कारशेडचा वापर करण्यात येणार आहे. तर ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांतील पहिल्या टप्प्याच्या संचलनासाठी गायमुख टर्मिनल स्थानक येथे पर्यायी सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. लवकरच वाहतूक सेवेत दाखल असलेल्या मेट्रोचे जाळे विस्तारणार आहे, त्यात आणखी २० किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकांची भर पडणार असून ठाण्यात पहिली मेट्रो धावणार आहे.

वाहतूक सेवेत दाखल मार्गिकांची संख्या ८ वर जाणार

सध्या मुंबईत ‘मेट्रो १’, ‘मेट्रो २ अ’, ‘मेट्रो ७’ आणि ‘मेट्रो ३’ मार्गिका वाहतूक सेवेत दाखल आहेत. आता ‘मेट्रो २ ब’, ‘मेट्रो ९’, ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांचा पहिला टप्पा डिसेंबरअखेर वाहतूक सेवेत दाखल झाल्यास एकूण मेट्रो मार्गिकांची संख्या थेट आठवर जाणार आहे. त्याचवेळी कार्यान्वित मेट्रोचे जाळे ५९ किमीवरून थेट १०० किमीच्या घरात जाणार आहे. ‘मेट्रो २ ब’, ‘मेट्रो ९’, ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांद्वारे २० किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विस्तारणार आहे. तर ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील बीकेसी – कुलाबा दरम्यानचा अंदाजे २० किमी लांबीचा टप्पाही याच वर्षात सेवेत दाखल होणार आहे. बीकेसी – वरळी मार्चअखेरपर्यंत, तर वरळी – कुलाबा टप्पा जूनपर्यंत वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे जूनअखेरपासून आरे – कुलाबा दरम्यान संपूर्ण भुयारी मेट्रो धावणार आहे.

‘मेट्रो ९’ मार्गिकेतील दहिसर पूर्व – काशीगाव पहिल्या टप्प्यातील चार स्थानके अशी

दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव

‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील मंडाले – डायमंड गार्डन पहिल्या टप्प्यातील स्थानके अशी

मंडाले, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक आणि डायमंड गार्डन

‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेतील कॅडबरी – गायमुख पहिल्या टप्प्यातील स्थानके अशी

कॅडबरी, माजीवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजीनी वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवानीवाडा आणि गायमुख