वडाळा-चेंबूर-वडाळा या मोनोरेल मार्गावर आता परतीचे तिकीटही उपलब्ध होणार आहे. ज्या अंतराचे परतीचे तिकीट हवे असेल त्यासाठी दुप्पट रक्कम प्रवाशांना मोजावी लागणार आहे. वडाळा ते चेंबूर अंतरासाठी ११ रुपये इतकी एकेरी तिकिटाची रक्कम असून याच अंतराच्या परतीच्या प्रवासासाठी २२ रुपये मोजावे लागणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी मोनोरेलच्या सर्व स्थानकांवर परतीचे तिकीट मिळणार असून तशा सूचना लावण्यात आल्या आहेत. मोनोरेलच्या सर्व स्थानकांवरील तिकिट घरे पहाटे ५.५० ते रात्री १० पर्यंत सुरू राहणार आहेत. मोनो रेलमार्गावर परतीचे तिकीट पहिल्यांदाच उपलब्ध होणार असल्याने सर्व स्थानकांवर याबाबत प्रवाशांना माहिती मिळावी, यासाठी अतिरिक्त माहिती सहाय्यक उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी सांगितले.

Story img Loader