मुंबई : मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कोट्यवधी रुपये खर्चाचे प्रकल्प राबवित आहे. प्रकल्पांसाठी लागणारा कोट्यवधींचा निधी कर्ज रुपाने उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार मेट्रो, दुहेरी बोगदे, सागरी सेतूसह अनेक प्रकल्पासाठी सुमारे ४ लाख ७ हजार कोटी रुपयांची कर्ज उभारणी करण्यात एमएमआरडीएला यश मिळाले आहे. विविध वित्तीय संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या कर्जासाठी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपुमख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यानी पतमर्यादा सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे आता ४ लाख कोटी रुपयांचे अर्थबळ प्रकल्पांना मिळणार असून विविध प्रकल्पांना चालना मिळणार आहे.
एमएमआरडीएकडून ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणले जात आहे, तर ठाणे – बोरिवली दुहेरी बोगदा, ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्ह दुहेरी बोगदा, उत्तन – विरार सागरी सेतू, ठाणे सागरी किनारा मार्ग, पूर्वमूक्त मार्ग विस्तारीकरण यांसारखे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी कर्ज रुपाने निधी उभारणी करण्यात आली आहे. त्यानुसार गृहनिर्माण आणि शहरी विकास महामंडळाकडून अर्थात ‘हुडको’कडून एमएमआरमध्ये गृहनिर्माण, वाहतूक आणि शहरी विकास प्रकल्पांसाठी १.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात आले आहे. तर ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाकडून (आरईसी) १ लाख कोटी रुपयांची कर्ज उभारणी शहरी वाहतूक, ऊर्जा कार्यक्षमता आणि एकात्मिक पायाभूत सुविधांसह क्षेत्रांसाठी केली आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनकडून (पीएफसी) १ लाख कोटींची कर्ज उभारणी ऊर्जा-कार्यक्षम पायाभूत सुविधा, शाश्वत वाहतूक आणि शहरी सेवांसाठी करण्यात आली आहे. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनकडून (आयआरएफसी) ५०,००० कोटी रुपयांची कर्ज उभारणी मेट्रो, उपनगरीय रेल्वे, मल्टीमोडल वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधांचा विकासाकरीता करण्यात आली आहे. नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंटकडून (एनएबीएफआयडी) ७००० कोटींची कर्ज उभारणी वाहतूक, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि शहरी सेवांसह विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी करण्यात आली आहे.
विविध वित्तीय संस्थांकडून ४ लाख ७ हजार कोटींची कर्ज उभारणी करण्यात आली असतानाच याआधी आरईसीकडून ३०,५९३ कोटी रुपयांची तर पीएफसीकडून ३१.५६३ कोटी रुपयांची कर्ज उभारणी करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणार्या कर्ज उभारणीमुळे सध्या चालू असलेल्या आणि लवकरच हाती घेण्यात येणाऱ्या प्रकल्पांतील आर्थिक निधीची तरतूद पूर्ण होणार असून प्रकल्पांना चालना मिळणार आहे. तर एमएमआरला ग्रोथ हब म्हणून ओळख निर्माण करून देशाच्या आर्थिक विकास वाढीला बळ देण्याचे उद्दिष्ट आम्ही यशस्वीरित्या गाठू, अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी यांनी दिली.