मुंबई : वांद्रे – कुर्ला संकुल येथील वाहतूक कोडींचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पॉडटॅक्सीचा पर्याय स्वीकारला आहे. या प्रकल्पाची उभारणी, देखभाल आणि संचलन यासाठी एमएमआरडीएने मागविलेल्या निविदेला दक्षिणेतील दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. लवकरच निविदा अंतिम करून प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र अशी ओळख असलेल्या बीकेसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी वाहतूक व्यवस्थेचे विविध पर्याय एमएमआरडीएच्या विचाराधीन आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता एमएमआरडीएने बीकेसीत पॉडटॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंजुरी मिळाल्याबरोबर एमएमआरडीएने मार्चमध्ये या प्रकल्पाची उभारणी, देखभाल, संचलनासाठी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. दरम्यानच्या काळात या निविदेला अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र तांत्रिक निविदा मंगळवारी खुल्या करण्यात आल्या असून यात दोन कंपन्यांनी निविदा सादर केल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा…अवघ्या शंभर रुपयांवरून झालेल्या वादातून गळ्यावर वार, आरोपीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

निविदा सादर करणाऱ्या दोन्ही कंपन्या दक्षिणेतील आहेत. हैदराबादमधील साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि चेन्नईतील रिफेक्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या या निविदा आहेत. आता निविदांची छाननी करून लवकरच आर्थिक निविदा खुल्या करण्यात येणार आहेत. त्यानंतर निविदा अंतिम करून कंत्राट बहाल करण्यात येणार आहे. शक्य तितक्या लवकर या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

हेही वाचा…मुंबई : निवडणुकीच्या कामावरून शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर

असा आहे पॉडटॅक्सी प्रकल्प

वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते कुर्ला पूर्व रेल्वे स्थानक बीकेसी मार्गे ८.८ किमी लांबीचा पॉडटॅक्सीचा मार्ग एमएमआरडीए बांधणार आहे. हा मार्ग उन्नत असेल. स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक प्रणालीअंतर्गत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. ८.८ किमीच्या मार्गात ३८ स्थानके असतील. प्रति सहा प्रवासी क्षमतेची ही पॉड टॅक्सी ३.५ मीटर लांब, १.४७ मीटर रुंद आणि १.८ मीटर उंच असेल. ताशी ४० किमी वेगाने ही टॅक्सी धावणार आहे. या प्रकल्पासाठी १०१६.३८ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक – खासगी तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या मार्गासाठी ५००० चौरस मीटर जागेवर डेपो बांधण्यात येणार आहे. या पॉडटॅक्सीतून कुर्ला – बीकेसी किंवा वांद्रे – बीकेसी अंतर पाच ते सहा मिनिटांत पार करता येणार आहे. मात्र त्यासाठी प्रवाशांना प्रति किमी मागे २१ रुपये पैसे मोजावे लागणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda moves forward with pod taxi project to ease traffic in bkc two south based companies submit tenders mumbai print news psg