मुंबई : ‘गुंदवली – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो ७ अ’ मार्गिकेतील १.६४७ किमी लांबीच्या बोगद्याचे भुयारीकरण नुकतेच पूर्ण झाले. आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दुसऱ्या बोगद्याच्या कामाला वेग दिला आहे. २.०३५ किमी लांबीच्या दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण पूर्ण करून दुसरे टनेल बोरिंग यंत्र (टीबीएम) मेअखेरीस भूगर्भातून बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘मेट्रो ७ अ’ मार्गिकेच्या कामातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा लवकरच पूर्ण होणार आहे.

उन्नत आणि भुयारी मेट्रो मार्गिका

‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकेचा विस्तार ‘गुंदवली – छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ अशा मेट्रो ७ अ’ मार्गिकेच्या माध्यमातून केला जात आहे. ही मार्गिका ३.४ किमी लाबीची असून या मार्गिकेतील ०.९४ किमीचा भाग उन्नत, तर २.५०३ किमी भाग भुयारी आहे. या मार्गिकेचे काम सध्या एमएमआरडीए करीत असून ही मार्गिका डिसेंबर २०२६ पर्यंत वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. त्यामुळे एमएमआरडीएने आता कामाला वेग दिला आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात एमएमआरडीएने या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.

गेल्या आठवड्यात १.६४७ किमी लांबीचे भुयारीकरणाचे काम पूर्ण करून ‘दिशा’ नावाचे टनेल बोरिंग यंत्र (टीबीएम) भुगर्भातून बाहेर आले. दरम्यान, २०२३ मध्ये दोन टीबीएम यंत्रे भूगर्भात सोडण्यात आली होती. यापैकी एक टीबीएम बाहेर आले असून दुसरे टीबीएम लवकरच भूगर्भातून बाहेर येणार आहे.

सध्या दुसऱ्या बोगद्याचे १०० मीटर भुयारीकरण शिल्लक

दुसरा बोगदा २.०३५ लांबीचा आणि ६.३५ मीटर व्यासाचा आहे. या बोगद्याच्या भुयारीकरणाचे काम टीबीएमच्या माध्यमातून सुरू आहे. आता केवळ १०० मीटरचे भुयारीकरण पूर्ण होणे शिल्लक आहे. उर्वरित भुयारीकरण पूर्ण करण्यास किमान महिन्याभराचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळ मेअखेरीस दुसरे टीबीएम यंत्रण भूगर्भातून बाहेर येण्याची शक्यता आहे. भुयारीकरणाचे काम अवघड असून त्यास अधिक वेळ लागतो. हे काम पूर्ण झाल्यास ‘मेट्रो ७ अ’च्या मार्गिकेच्या कामास वेग येईल आणि निश्चित वेळेत ही मार्गिका पूर्ण होईल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे.