एमएमआरडीएकडून ठाण्यावर सतत अन्याय करण्यात येत असून विकासकामांसाठी हेतुपुरस्सर निधी दिला जात नाही. त्यामुळे या शहराच्या विकासासाठी प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातील, असा इशारा राष्ट्रवादीचे खासदार संजीव नाईक यांनी शनिवारी येथे दिला. याच व्यासपीठावर पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यावर राज्यातील सरकारकडूनच अन्याय सुरू असून नवी मुंबईच्या विकासाचे सूत्र ठाण्यात वापरण्याची वेळ आली आहे. ते जमत नसेल तर ठाण्यासाठी स्वतंत्र विकास प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी करून सत्ताधारी सरकारवरच वडील-मुलाने जोरदार शाब्दिक हल्ला चढविला.
एमएमआरडीएने आतापर्यंत ठाणे शहर परिसराच्या विकासासाठी किती निधी खर्च केला, याची माहिती माहिती अधिकारात मागवून त्याआधारे न्यायालयात जाण्याची तयारी करण्यात येईल, अशा शब्दांत खा. नाईक यांनी एमएमआरडीएची हजेरी घेतली.
ठाण्यातील पातलीपाडा उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त क्षीरसागर, आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित,  व स्थानिक आमदार एकनाथ शिंदे व इतर, अतिरिक्त महानगर आयुक्त श्रीनिवास उपस्थित होते.
येत्या पाच वर्षांत ठाणे, नवी मुंबई परिसरात विकासासाठी १५ ते २० हजार कोटी रुपये खर्च करायचे आहेत. याच माध्यमातून सिंगापूर, हाँगकाँगच्या धर्तीवर या भागात जलवाहतूक सुरू करण्याचा विचार असल्याचे पालकमंत्री नाईक यांनी सांगितले. विकासकामांची नागरिकांना कोणतीही आर्थिक झळ बसणार नाही, अशी विकासकामे येत्या पाच वर्षांत ठाणे परिसरात राबवायची आहेत. तसेच या भागाच्या विकासासाठी एमएमआरडीएने अधिक निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही ते म्हणाले.  
शहरात सुरू असलेल्या उड्डाणपुलांचा आढावा घेऊन चांगले रस्ते, पूल देण्यास शासन प्रयत्नशील आहे, असे मंत्री क्षीरसागर यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्य़ातील वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. नवीन वळणमार्गाची गरज निर्माण झाली आहे. निधीच्या कमतरतेमुळे ही कामे प्राधान्याने होत नसल्याने या निधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू, असे राज्यमंत्री गावित यांनी सांगितले.
शिवसेनेची रुसवाफुगवी
ठाण्यातील रखडलेल्या उड्डाणपुलाचा प्रश्न तातडीने सोडविण्यात येत नसल्याचा निषेध म्हणून शिवसेनेचे आमदार व्यासपीठावर गेले नाहीत. उपसभापतींनी मंत्री क्षीरसागर यांच्यासह खोळंबलेल्या पुलाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सेनेचे आमदार व्यासपीठावर आसनस्थ झाले. ठाणे पालिकेच्या अनास्थेमुळे हे पूल खोळंबल्याचा टोला या वेळी क्षीरसागर यांनी सेनेच्या ताब्यातील ठाणे पालिकेला लगावला.
ठाण्याचे चौभाजन
ठाणे जिल्ह्य़ाचा सर्वागीण विकास करायचा असेल तर यासाठी चार भागांतच ठाणे जिल्ह्य़ाचे विभाजन झाले पाहिजे, या मागणीचा पालकमंत्री गणेश नाईक यांनी पुनरुच्चार केला.