भाईंदर व नायगावदरम्यान वसई खाडीवर वाहनांसाठी एमएमआरडीएकडून उड्डाणपूल बांधण्याचा अंतिम निर्णय झाला असून, त्याची निविदा प्रक्रिया डिसेंबरअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना महामार्गापर्यंत वळसा घालण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही, तसेच विरार ते भाइंदर शहरे सरळ मार्गाने जोडली जातील.
सध्या भाइंदरवरून पुढे वसई-नालासोपारा-विरारला जाण्यासाठी अहमदाबाद महामार्ग हा एकमेव पर्याय होता. त्यामुळे रस्तामार्गे जाताना नागरिकांचा वेळ आणि इंधनाचा अधिक खर्च होत असे. भाईंदर-नायगावदरम्यानचा ब्रिटिशकालीन लोखंडी पूल वापरासाठी देण्याची बरीच वर्षे नागरिकांची मागणी होती; परंतु तो कमकुवत असल्याने त्याला परवानगी मिळाली नाही.
२७ ऑगस्टला झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत नव्याने उड्डाणपूल बांधण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाले. हा पूल चार पदरी असेल. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक-दोन वर्षांत पुलाचे काम सुरू होण्याची अपेक्षा आहे.