मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ४२४० कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली असून चारकोप-मानखुर्द दुसरी मेट्रो, कुलाबा-सीप्झ तिसरी मेट्रो, या नेहमीच्या प्रकल्पांसह प्रामुख्याने मुंबई लगतच्या परिसरातील उड्डाणपूल, खाडीपुलांसाठी त्यात तरतूद करण्यात आली आहे. मोनोरेलच्या वडाळा-संत गाडगे महाराज चौक या पुढच्या टप्प्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करत त्याचे काम याच वर्षी संपवणे हे आता ‘एमएमआरडीए’चे लक्ष्य असल्याचे संकेत देण्यात आले आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणाच्या बैठकीत ३६२८ कोटी रुपयांच्या मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी देताना त्यासाठी ६५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रेवसपासून कारंजापर्यंत जाणारा रेवस खाडीपूल, माणकोली-मोटेगाव आणि उल्हास खाडीजवळील कल्याण-भिवंडी रस्त्यावरील दोन पुलांचे काम मार्गी लागणार आहे. तसेच खोपोली शहर वळण रस्ता, भिवंडी वळण रस्ता, कल्याण वळण रस्ता, शिरगाव फाटा आणि बदलापूरला जोडणाऱ्या रस्त्याचा समावेश आहे.
प्रमुख तरतुदी
*‘एमयूटीपी-२’साठी एक हजार कोटींची तरतूद, ‘एमआरव्हीसी’मार्फत नवीन रेल्वेगाडय़ा खरेदी होणार
*मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ६३४ कोटी रुपये
*मोनोरेलचा वडाळा-संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्यासाठी ४०० कोटी रुपये
*वरळी-शिवडी उन्नत मार्गासाठी ५० कोटी रुपये
*मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी २१५ कोटी रुपये
‘मेट्रो’साठी चार कोटी
चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो रेल्वे मार्गासाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा मार्ग पूर्णपणे भुयारी बांधण्याचा निर्णय झाल्याने सर्वेक्षणासाठी ही तरतूद करण्यात आली आहे.