मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वर्सोवा – विरार सागरी सेतू प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र मच्छीमारांचा, मच्छीमार संघटनांनी सागरी सेतू आणि सर्वेक्षणाला कडाडून विरोध केला आहे. मच्छीमारांनी सर्वेक्षणाचे काम बंद पाडल्यामुळे एमएमआरडीएची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांचे मन वळविण्यासाठी एमएमआरडीएने मत्स्य व्यवसाय विभागाला साकडे घातले आहे. मच्छीमार आणि एमएमआरडीएची संयुक्त बैठक आयोजित करून त्यावर तोडगा काढण्याची मागणी एमएमआरडीने केली आहे.
एमएमआरडीए वर्सोवा – विरार दरम्यान ४२.७५ किमी लांबीचा सागरी सेतू बांधण्याचे काम हाती घेणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्पस्थळी विविध प्रकारच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. विविध ठिकाणी सर्वेक्षणासाठी जाणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना रोखण्यात येत आहे. मच्छीमार बांधव सर्वेक्षण बंद पाडत आहे. दरम्यान, सागरी सेतूसारखा महत्त्वाचा प्रकल्प राबविताना मच्छिमारांनाच विश्वासात घेण्यात आलेले नाही, असा आक्षेप मच्छिमारांनी घेतला आहे. या प्रकल्पामुळे मच्छीमारी व्यवसाय धोक्यात येणार आहे. त्यामुळे मच्छीमारांशी चर्चा करणे आवश्यक होते. पण तसे न करता प्रकल्प राबविण्याची तयारी करण्यात येत असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी केला आहे. मच्छीमारांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प राबवावा, आमचा प्रकल्पाला विरोध नाही, पण मच्छीमारी व्यवसाय धोक्यात येणार नाही यादृष्टीने आवश्यक त्या तरतुदी करून प्रकल्प राबवावा, अशी मागणी तांडेल यांनी केली.
हेही वाचा… मुंबई : वाहन चोरीप्रकरणी मध्य प्रदेशातून दोघांना अटक
हेही वाचा… मुंबई : फ्लेमिंगोंच्या सुरक्षेसाठी डीपीएस तलाव कुंपणबंद
मच्छीमारांच्या विरोधामुळे सर्वेक्षण करणे एमएमआरडीएसाठी अशक्य बनले आहे. यामुळे प्रकल्पाला फटका बसण्याचीही शक्यता आहे. मच्छीमारांचे मने वळविण्यासाठी एमएमआरडीएने मत्स्य व्यवसाय विभागाला एका बैठक आयोजित करण्याची विनंती केल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली. दरम्यान, मच्छीमार संघटनांनीही एमएमआरडीएबरोबर बैठक आयोजित करण्यासाठी वेळ मागितल्याचे तांडेल यांनी सांगितले.