मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील काम मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मिरा-भाईंदर शहराला प्रतिदिन २१८ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होईल, असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले होते. मात्र काही कारणांमुळे या प्रकल्पाला विलंब झाला असून आतापर्यंत दुसऱ्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम जूनअखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच १३२ केव्ही ट्रान्समिशन लाईनचे काम पूर्ण होण्यास आणखी काही महिने लागणार आहेत. त्यामुळे मुबलक पाण्यासाठी मिरा-भाईंदरकरांना आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वसई-विरार आणि मिरा-भाईंदरमधील पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावून या शहरांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे १३२५.७८ कोटी रुपये खर्चाचा सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत ४०३ दशलक्ष लिटर क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला २०१७ मध्ये सुरुवात झाली. काम सुरू झाल्यापासून ३४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक तांत्रिक अडचणी, भूसंपादन आणि इतर समस्यांमुळे हे काम संथ गतीने सुरू राहिले आणि प्रकल्पाला विलंब झाला. मात्र एमएमआरडीएने २०२१ नंतर कामाला गती दिली. त्यामुळेच जून २०२३ मध्ये या प्रकल्पातील पहिला टप्पा पूर्ण झाला आणि नोव्हेंबर २०२३ पासून वसई-विरारला पाणीपुरवठा सुरू झाला. दरम्यान, या प्रकल्पाचा दुसरा टप्पा मे २०२४ मध्ये पूर्ण होईल असे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले होते. मात्र हा मुहूर्त आता चुकला आहे.
हेही वाचा…निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शनिवारपासून तीन दिवस मद्य विक्री बंद
सूर्या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाबाबत एमएमआरडीएकडे विचारणा केली असता आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. उर्वरित काम जूनअखेरपर्यंत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी राष्ट्रीय महामार्ग ४८ चे काँक्रिटीकरण सुरू आहे. त्यामुळे सूर्या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्याच्या कामास विलंब होत आहे. महत्त्वाचे म्हणजे दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित १० टक्के काम जूनअखेरीस पूर्ण होईल, मात्र मिरा-भाईंदर शहरांना प्रत्यक्ष पाणीपुरवठा करण्यासाठी १३२ केव्हीच्या ट्रान्समिशन लाईनची आवश्यक आहे. त्यासाठी आणखी काही महिने लागणार आहेत. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत मिरा-भाईंदरकरांना मुबलक पाण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.