मुंबई : दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ आणि कल्याण ते तळोजा मेट्रो १२ मार्गिकेसाठीच्या कारशेडचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ताब्यात देण्याबाबतचे आदेश जारी झाले आहेत. मात्र दुसरीकडे महत्त्वाच्या अशा वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४, कासारवडळवली ते गायमुख मेट्रो ४ अ आणि ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेतील कारशेडच्या जागेची मात्र एमएमआरडीएला अजूनही प्रतीक्षाच आहे. मोघरपाडा आणि कशेळी येथील जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. पण अजूनही या जागा ताब्यात आलेल्या नाहीत.

हेही वाचा >>> कर्तव्यावरील आरपीएफ जवानाचा मृत्यू

मेट्रो प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे कारशेड. कारशेडशिवाय मेट्रो धावूच शकत नाही. त्यामुळे कारशेडचा प्रश्न निकाली लावत मेट्रोची कामे हाती घेणे आवश्यक होते. मात्र एमएमआरडीएने मेट्रोची कामे सुरू केली, पण कारशेडचा प्रश्न निकाली लावला नाही. त्यामुळे अनेक मार्गिकेतील कारशेडच प्रश्न  प्रलंबित आहे आणि त्याचा परिणाम मार्गिकांच्या कामावर झाला. आता मात्र एमएमआरडीएने कारशेडचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. यापुढे आधी कारशेड मग काम असे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार सध्या काम सुरु असलेल्या मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेडचा प्रश्न निकाली लावला आहे तर मेट्रो १२ चे काम सुरु होण्यापूर्वीच कारशेडची जागा ताब्यात घेण्यात एमएमआरडीएला यश आले आहे. मेट्रो ९ साठी उत्तन, डोंगरी येथील ५९ हेक्टर तर मेट्रो १२ साठी निळजे-निळजेपाडा येथील ४७ हेक्टर जागा ताब्यात घेण्यासंबंधीचे आदेश नुकतेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आता या आठवड्यात ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात येईल. असे असताना सध्या वेगाने काम सुरु असलेल्या मेट्रो ४, ४ अ आणि मेट्रो ५ मधील कारशेडची जागा अद्याप ताब्यात आलेली नाही. मात्र ही जागा लवकरच ताब्यात येईल. जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.  महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी याला दुजोरा दिला आहे. मेट्रो ४, ४ अ साठी ठाण्यातील मोघरपाडा येथील १७४ हेक्टर जागा आणि मेट्रो ५ साठी कशेळी येथील २७ हेक्टर जागा एमएमआरडीएला कारशेडसाठी आवश्यक आहे.