मुंबई : मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पातील आर्थिक अडचण अखेर आता दूर झाली आहे. नऊ मेट्रो मार्गिकांसह इतर प्रकल्पासाठी ३० हजार ४८३ कोटींचे कर्ज घेण्यास गुरुवारी प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे मेट्रोसह इतर प्रकल्प आता वेग घेणार आहेत. दुसरीकडे १७ हजार २१४ कोटी रुपये खर्च करून मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी २० प्रकल्प राबविले जाणार आहेत. या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासही प्राधिकरणाने मंजुरी दिली.
मुख्यमंत्री तसेच एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्राधिकरणाची १५३ वी बैठक गुरुवारी पार पडली. एमएमआरडीएकडून आजच्या घडीला मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात एक लाख कोटींहुन अधिकचे पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यात येत आहे. अशा वेळी एमएमआरडीएची आर्थिक स्थिती पाहता या प्रकल्पासाठी लागणारा निधी कर्जाच्या माध्यमातून जमा करण्याची वेळ एमएमआरडीएवर आली आहे. त्यानुसार एमएमआरडीएने ६० हजार कोटींचे कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. याला सरकारनेही मान्यता दिली. या पार्श्वभूमीवर आता अखेर ३० हजार ४८३ कोटींचे कर्ज एमएमआरडीएला उपलब्ध होणार आहे.
भारत सरकारचा उपक्रम असलेल्या मेसर्स आरईसी या वित्तीय संस्थेकडून ३० हजार ४८३ कोटींचे कर्ज उभारण्यास यावेळी मंजुरी देण्यात आली. त्यानुसार एमएमआरडीए आणि मे. आरईसी यांच्यात करार झाला. या कर्ज उभारणीमुळे आता मेट्रो प्रकल्पांना विशेष गती मिळणार आहे.
प्राधिकरणातील मंजुरी मिळालेले प्रकल्प..
वांद्रे-कुर्ला संकुलातील‘सी ६९ सी’ (५८०७ चौ मीटर क्षेत्रफळ) आणि ‘सी ६९ डी’(६०७७ चौ मीटर क्षेत्रफळ) या दोन भूखंडांची ई -लिलावानुसार या भूखंडाच्या वाटपास मंजुरी. एमएमआरडीएच्या तिजोरीत २०६६ कोटी जमा होणार.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बीकेसीतील जागा नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला देण्यास मंजुरी.
ठाणे शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी रायलादेवी तलाव सुशोभीकरणाच्या कामासाठी ३९.३१ कोटींच्या खर्चास मंजुरी येऊर जंगलाच्या पायथ्याशी रस्त्याचे काम करण्यासाठी ४८१ कोटींचा प्रस्ताव सादर
पाणी आणि घनकचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी..
एमएमआरमधील पिण्याच्या पाण्याचा आणि घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविण्यासाठीही एमएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. वसई-विरारला पाणी पुरवठा करण्यासाठी सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत विविध कामांसाठी जवळपास ९० कोटी हे दीर्घ मुदतीच्या स्वरूपात देण्यासाठीही मंजुरी देण्यात आली. वसई-विरारकरांना मुबलक पाणी देण्यासाठी पालघर येथील विक्रमगडमध्ये राबविण्यात येणाऱ्या देहरजी मध्यम प्रकल्पास १४४३ कोटींचा निधी देण्यासही मंजुरी मिळाली आहे. यातून सूर्या प्रकल्पास २५० एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यानुसार अंबरनाथ नगरपरिषद, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद आणि उल्हासनगर पालिका यांच्या संयुक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास अर्थसहाय्य करण्यास यावेळी मंजुरी देण्यात आली.