मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात विकास कामांचा धडका लावला आहे. मेट्रोसह अनेक पायाभूत प्रकल्प ठाण्यात राबविले जात आहेत, राबविण्यात येणार आहेत. या प्रकल्पांमध्ये आता आणखी एका बोगद्याची अर्थात भुयारी मार्गाची भर पडली आहे.
ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि ठाणे वसई, विरार, मीरा, भाईंदर प्रवास अतिवेगवान करण्यासाठी आता ‘एमएमआरडीए’ने वसई, फाऊंट हॉटेल नाका ते गायमुख, ठाणे असा बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. तर फाऊंटन हॉटेल ते भाईंदर असा उन्नत रस्ताही बांधण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या प्रस्तावास मंगळवारी एमएमआरडीएच्या प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हे दोन्ही प्रकल्प अंदाजे २० हजार कोटी खर्चाचे आहेत.
ठाणे ते बोरिवली प्रवास अतिजलद करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने ठाणे – बोरिवलीदरम्यान ११.८ किमीचा दुहेरी बोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. त्यातच आता ठाण्यातील वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी आणि ठाण्यावरून वसई, विरार, मीरा रोड आणि भाईंदरला जाणे सोपे व्हावे यासाठी फाऊंटन हॉटेल नाका, वसई ते गायमुख, घोडबंदर, ठाणे असा बोगदा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा >>> रोखे विक्रीतून निधी उभारणी; एमएमआरडीएच्या तिजोरीत खडखडाट, ५० हजार कोटींच्या रोखे विक्रीला मंजुरी
तसेच गायमुख ते वसई बोगद्याने येणाऱ्या वाहनांना पुढे मीरा रोड, भाईंदरला अतिवेगाने जाता यावे यासाठी फाऊंटन हॉटेल, वसई ते भाईंदर असा उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या प्रस्तावास मंगळवारी प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती ‘एमएमआरडीए’तील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
फाऊंटन हॉटेल नाका, वसई ते गायमुख बोगदा ५.५ किमीचा असेल तर फाऊंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत रस्ता १० किमीचा असणार आहे. या दोन्ही प्रकल्पासाठी अंदाजे २० हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. बोगदा चार मार्गिकेचा असणार असून उन्नत रस्ता सहा मार्गिकेचा असणार आहे. दोन्ही प्रकल्प प्राथमिक स्तरावर आहेत.
प्रकल्पाची गरज
घोडबंदर येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे, तेव्हा घोडबंदर ते वसई वा घोडबंदर ते भाईंदर असा रस्ता बांधण्यासाठी जागाच उपलब्ध नाही. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ठाणे खाडी आणि डोंगराळ भाग असल्याने रस्ता बांधणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे गायमुख ते फाऊंटन हॉटेल नाका असा बोगदा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.