मुंबई : सांताक्रूझ चेंबूर जोड रस्त्यावरील तीन उड्डाणपूलांची संरचनात्मक तपासणी करण्यात येणार असून या कामासाठी व्हिजेटीआय या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एमएमआरडीएने बांधलेल्या या जोड रस्त्याची १२ वर्षांतच संरचनात्मक तपासणी करावी लागणार आहे. या कामासाठी पालिका ३३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> मध्य रेल्वेचा ‘पांढरा हत्ती’ प्रवाशांसाठी त्रासदायक; वातानुकूलित लोकलच्या दहा फेऱ्या रद्द

सांताक्रूझ- चेंबूर लिंक रोड हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बांधलेला जोडरस्ता आहे. हा पूल २०१२ मध्ये वाहतूकीसाठी खुला करण्यात आला होता. एप्रिल २०१५ मध्ये हा मार्ग मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आला होता. ६.५ किमी लांबी आणि ४५.७ मीटर रुंदी असलेल्या या मार्गावर तीन उड्डाणपूल आहेत. अमर महल स्थानक उड्डाणपूल, कुर्ला- कलिना उड्डाणपूल आणि डबल डेकर उड्डाणपूल असे तीन पूल आहेत. या तीन पुलांची संरचनात्मक तपासणी करण्यात येणार असून या पुलांची आतापर्यंत कोणतीही दुरुस्ती केलेली नाही. पालिकेच्या विभाग कार्यालयाने आणि रेल्वे प्राधिकरणाने २०२१ मध्ये या पुलांची पाहणी केली होती. त्यावेळी या जोडरस्त्याची व पुलांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे पाहणीनंतर सुचवण्यात आले होते. त्यानुसार पालिकेने आता या कामासाठी व्हिजेटीआयची नियुक्ती करण्याचे ठरवले आहे. त्यासााठी ३३ लाख रुपये शुल्क संस्थेला दिले जाणार आहे.

हेही वाचा >>> जखमी गायीला कृत्रिम पाय; प्रत्यारोपणाची पहिली आणि यशस्वी शस्त्रक्रिया

या मार्गावरील तीन उड्डाणपुलांपैकी सीएसटी रोड उड्डाणपूल हा ३.४५ किमी लांबीचा मुख्य उड्डाणपूल आहे. एलबीएस मार्गावर ५६० मीटर लांबीचा कुर्ला-कलिना उड्डाणपूल आणि १.८ किमी लांबीचा दुहेरी स्तरांचा (डबल डेकर) उड्डाणपूल असे तीन उड्डाणपूल आहेत. या उड्डाणपुलांचे युपीव्हीसी पाईप तुटले आहेत, तुळईला तडे गेले आहेत, त्यावर वनस्पती वाढल्या आहेत, पदपथांची दूरवस्था झाली आहे, असे पाहणीच्यावेळी आढळून आले होते. ही पाहणी केवळ दृश्यस्वरुपातील होती. त्यामुळे पालिकेने आता या पुलांची संरचनात्मक तपासणी करण्याचे ठरवले आहे. त्यानंतर पुलांची मोठी दुरुस्ती करायची की डागडुजी करायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, कोणत्याही पुलांची संरचनात्मक तपासणी ही पुलाचे बांधकाम झाल्यानंतर २५ वर्षांनी केली जाते. मात्र या पुलांची १२ वर्षांतच तपासणी करावी लागते आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला व एमएमआरडीएने पालिकेकडे हस्तांतरित केलेल्या अंधेरी येथील पुलाच्या दुर्दशेचाही वाद सुरु आहे. या पुलाची दुरुस्ती करावी लागणार असून पालिका प्रशासनाने त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे.

Story img Loader