मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात विकासकामांचा धडका लावला आहे. ठाणातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी एमएमआरडीएने आता साडेसहा हजार कोटींहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांच्या कामास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.
बाळकूम ते गायमुख खाडी किनारा मार्ग, पूर्वमुक्त मार्गाचे घाटकोपर ते ठाणे विस्तारीकरण आणि कासारवडवली ते खारबांव खाडीपूल असे हे तीन प्रकल्प आहेत. तर या प्रकल्पांच्या व्यवस्थापनासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याकरिताही निविदा प्रसिद्ध केली आहे.
हेही वाचा >>> निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शैक्षणिक मुद्द्यांचा समावेश करा; शिक्षणतज्ज्ञांची राजकीय पक्षांकडे मागणी
ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी १३.१४ किमी लांबीचा बाळकुम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्ग बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. सहा मार्गिकांचा आणि ४०-४५ मीटर रुंदी असलेला हा खाडी किनारा मार्ग बाळकुमजवळील खारेगाव येथून सुरू होऊन घोडबंदर रस्त्यावरील गायमुख येथे संपणार आहे. बाळकुम, कोलशेत, वाघबीळ, ओवळा, कासारवडवली, मोघरपाडा येथून सागरी मार्ग जाईल. या किनारा मार्गासह मुंबईतून ठाण्याला पोहचणे सोपे व्हावे यासाठी पी. डीमेलो मार्ग ते चेंबूर पूर्वमुक्त मार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. पूर्वमुक्त मार्गाचा छेडानगर – आनंदनगर, ठाणेदरम्यान विस्तार करण्यात येत आहे. सहा मार्गिकांचा आणि १३ किमी लांबीचा हा विस्तारित असा पूर्वमुक्त मार्ग असणार आहे.
हेही वाचा >>> मुंबई: सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये १५ मार्चपासून सुरू होणार यकृत बाह्यरुग्ण विभाग
या दोन प्रकल्पांबरोबरच एमएमआरडीएने ठाण्यासाठी आणखी एक प्रकल्प हाती घेतला आहे. तो म्हणजे कासारवडवली ते खारबांव खाडीपूल. या तिन्ही प्रकल्पांना मंगळवारी एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत सुधारित मान्यता देण्यात आली. या मान्यतेनंतर तात्काळ हे तिन्ही प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएमआरडीएने शुक्रवारी बांधकामासाठी तसेच स्वतंत्र प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याकरिता निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. निविदेनुसार बाळकूम ते गायमुख खाडीपुलासाठी २५२७.९१ कोटी रुपये, छेडानगर ते ठाणे पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरणासाठी २५६०.६१ कोटी रुपये, तर कासारवडवली ते खारबांव खाडीपुलासाठी १४५३.३७ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण आणि बाळकूम ते गायमुख खाडीपूल या दोन्ही प्रकल्पाच्या बांधकामासाठी ४८ महिने, तर कासारवडवली ते खारबांव खाडीपुलाच्या बांधकामासाठी ४२ महिने लागणार आहे.