मुंबई : मेट्रो स्थानकातून बाहेर पडणे आणि इच्छित स्थळी वा रेल्वे स्थानक, बेस्ट स्थानक, रिक्षा-टॅक्सी थांब्यापर्यंत जाणे प्रवाशांना सोपे व्हावे यासाठी अनेक मेट्रो स्थानके पादचारीपुलाशी जोडली जात आहेत. त्यानुसार आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘वडाळा – घाटकोपर – ठाणे – कासारवडवली – गायमख मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेवरील चार मेट्रो स्थानके पादचारीपुलाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विक्रोळी, पंतनगर, भांडूप आणि विजय गार्डनर ही चार मेट्रो स्थानके पादचारीपुलाने जोडण्यासाठी एमएमआरडीएने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

या निविदेनुसार १२९ कोटी रुपये खर्च करून काम सुरू झाल्यापासून १५ महिन्यांच्या कालावधीत पादचारीपुलांची कामे पूर्ण केली जाणार आहेत. हे पादचारीपूल तयार झाल्यास विक्रोळी, पंतनगर, भांडूप आणि विजय गार्डन मेट्रो स्थानकातून बाहेर पडणे आणि इच्छित स्थळी पोहचणे सोपे होणार आहे.

पंतनगरमधील पादचारीपूल सर्वाधिक लांबीचा एमएमआरडीएकडून ३२.३२ किमी लांबीच्या मेट्रो ४ मार्गिकेचे आणि कासारवडवली – गायमूख अशा २.८८ किमी लांबीच्या ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरू आहे. या मार्गिका टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. आता एमएमआरडीएने ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकेतील मेट्रो स्थानकाबाहेर पडत इच्छितस्थळी वा रिक्षा थांबा, टॅक्सी थांबा तसेच बेस्ट स्थानक वा नजीकच्या रेल्वेस्थानकापर्यंत प्रवाशांना पोहचणे सोपे व्हावे यासाठी मेट्रो स्थानके पादचारीपुलाशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नुकत्याच विक्रोळी, पंतनगर, भांडूप आणि विजय गार्डन मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पादचारीपुलांची बांधणी करण्यासाठी एमएमआरडीएने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. निविदेनुसार पंतनगर मेट्रो स्थानक येथे ६६५ मीटर लांबीचा, विक्रोळी मेट्रो स्थानक येथे ३८७ मीटरचा, भांडूप मेट्रो स्थानक येथे ४५ मीटरचा, तर विजय गार्डन मेट्रो स्थानक येथे ६० मीटर लांबीचा पादचारीपूल बांधण्यात येणार आहे. या चारही पुलांसाठी १२९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, पंत नगरमधील पादचारीपूल सर्वाधिक लांबीचा, ६६५ मीटर इतका असणार आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

या चार पुलाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरात लवकर निविदा अंतिम करून प्रत्यक्ष पादचारीपुलांच्या कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. तर कामास सुरुवात झाल्यापासून १५ महिन्यांच्या कालावधीत पुलांचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे ‘मेट्रो ४’ मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास प्रवाशांना या चार मट्रो स्थानकांतून बाहेर पडून इच्छित स्थळी जाणे सोपे होणार आहे. तर महत्त्वाचे म्हणजे येत्या काळात ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ मार्गिकांतील अन्य मेट्रो स्थानकेही आवश्यकतेनुसार पादचारीपुलांनी जोडली जाणार असून या मार्गिकांवर भविष्यात प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, निविदेनुसार या चारही पादचारीपुलांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाणार आहे. पुलावर सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी उद्वाहनाचीही सुविधाही उपलब्ध करण्यात येणार आहे.