वरळीच्या कॅम्पाकोला इमरातीतील रहिवाशांनी सेव्ह कॅम्पाकोला आंदोलन मागे घेत महापालिकेला सहकार्य करण्याची तयारी दाखविल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅम्पाकोलाच्या रहिवाशांना कायद्याच्या चौकटीत राहून सर्व मदत करण्याचे आश्वासन रविवारी दिले.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी कॅम्पाकोलावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला मात्र रहिवाशी तसेच मनसेने केलेल्या विरोधामुळे ही कारवाई पालिकेला थांबवावी लागली. मनसेचे विधानसभेतील गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांनी पालिका अधिकाऱ्यांकडे काही वेळ मागितला तसेच कॅम्पाकोलातील रहिवाशांना घेऊन त्यांनी वर्षां या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थनी मुख्यमंत्री पृथ्वीराच चव्हाण यांची भेट घेतली. सोसायटीतील अतिरिक्त चटईक्षेत्र वापरून जी घरे नियमित करता येतील ती नियमित करावी अशी विनंती बाळा नांदगावकर यांनी मुख्यमंत्र्यांना केली. तसेच पालिका आयुक्त कुंटे यांना याप्रकरणी कायदेशीर बाबी तपासून सहकार्य करण्यास सांगावे अशी विनंतही नांदगावकर यांनी केली. रहिवासी महापालिकेला कारवाईसाठी सहकार्य करतील केवळ चार-पाच ज्येष्ठ नागरिकांच्या घराचे पाणी व गॅस अंतिम निर्णय होईपर्यंत तोडू नये अशीही विनंती रहिवाशांनी केली. सलग तिसऱ्या दिवशी कॅम्पाकोला येथे कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला हात हलवत परत यावे लागले याबाबत मुख्यमंत्र्यांनी रहिवाशांच्या शिष्टमंडळाकडे नाराजी व्यक्त केली.

Story img Loader