सांताक्रुझ पूर्व स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हुसकावून लावल्याप्रकरणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या (मनसे) सहा कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांच्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यामुळे फेरीवाले विरुद्ध मनसे हा संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठाणे, कल्याण, डोंबिवली स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांविरोधातील कारवाईनंतर रविवारी सांताक्रुझ येथील मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन करत त्यांना दमदाटी करून हटवले. रविवारी रात्री आंदोलनादरम्यान फेरीवाल्यांविरोधात मोर्चा काढून तिथे जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यामुळे परिसरातील वातावरण तंग झाले होते. मनसेच्या आंदोलनानंतर काही फेरीवाल्यांनी तेथून पळही काढला. मात्र एका फेरीवाल्याने केलेल्या तक्रारीनंतर वाकोला पोलिसांनी संबंधित मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवला. अटक झालेल्यांमध्ये मनसेचे युवा अध्यक्ष अखिल चित्रे यांच्यासह शाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. संदेश गायकवाड, हेमंत गायकवाड, विनल दर्हीकर, चंद्रशेखर मडव, विशाल शिरवडकर अशी अटक झालेल्या उर्वरित मनसे कार्यकर्त्यांची नावे आहेत.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर स्थानकांमधील गर्दीत भर टाकणारा फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चा काढून १५ दिवसात फेरीवाल्यांना न हटविल्यास आपले कार्यकर्ते हे काम करतील, असा इशारा दिला. या इशाऱ्याला १५ दिवस झाल्याने गेल्या शनिवारपासून मनसेच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेत फेरीवाल्यांना आपल्या ‘स्टाईल’ने हटविण्यास सुरुवात केली. मात्र फेरीवाल्यांविरोधातील ही कारवाई मनसे कार्यकर्त्यांच्या अंगलट येताना दिसत आहे. कल्याण, डोंबिवली येथे मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या तक्रारीनंतर सांताक्रुझ येथील मनसे कार्यकर्त्यांनाही सोमवारी वाकोला पोलिसांनी फेरीवाल्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी अटक केली.

सोमवारी दुपारी त्यांना महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने प्रत्येकाची पाच हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली.

Story img Loader