मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये गोवंडीमधील शिवाजी नगर परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली असून अनेक वेळा तक्रारी करूनही मुंबई महानगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानाबाहेर या अनधिकृत बांधकामांचे प्रदर्शन भरवण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या ‘एम-पूर्व’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत गोवंडी-शिवाजी नगर परिसर येत असून या परिसरात ९० टक्के झोपडपट्टी आहे. गेल्या काही वर्षांत या परिसरातील लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. परिणामी, परिसरात ४ – ५ मजली झोपड्या उभ्या राहात आहेत. झोपडपट्टीत १४ फुटांपर्यंत बांधकामास मुंबई महानगरपालिकेची परवानगी आहे. मात्र शिवाजी नगर परिसरात ४० ते ५० फुटांपर्यंत अनधिकृत झोपड्या उभ्या राहात आहेत. लोखंडी खांबांच्या साह्याने ४ – ५ मजले उभे केले जात आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – अ. भा. मराठी नाट्य परिषद निवडणूक : २० उमेदवार बिनविरोध विजयी
हेही वाचा – मुंबई-जीवी : वन अधिकाऱ्याचे नाव मिळालेला आरेमधील कोळी
याबाबत मनसेचे चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष सतीश वैद्य यांनी महानगरपालिकेच्या ‘एम पूर्व’ विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी संपूर्ण गोवंडी परिसरातील अनधिकृत बांधकामाचे प्रदर्शन महानगरपालिका कार्यालयाबाहेर भरवले होते. मात्र आद्यपही महानगरपालिकेने कारवाई केलेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत या अनधिकृत बांधकामाचे प्रदर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवस्थानाबाहेर भरवण्यात येईल, असा इशारा सतीश वैद्य यांनी दिली आहे.