मुंबई : शिवडी – वरळी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्ग १२५ वर्ष जुन्या प्रभादेवी रेल्वे पुलाचे पाडकाम करून त्या जागी नवीन द्विस्तरीय पुलाची बांधण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घेतला आहे. मात्र हा पूल बंद करून त्याचे पाडकाम करण्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केला आहे.
नवीन द्विस्तरीय पुलाचे काम ज्या ठिकाणी केले जाणार आहे, त्या ठिकाणच्या दोन बाधित इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही, असे असताना एमएमआरडीए पूल बंद करून त्याचे पाडकाम करण्याची घाई का करीत आहे, असा प्रश्न उपस्थित करीत मंगळवारी मनसेने प्रभादेवी पूल येथे आंदोलन केले. आधी पुनर्वसन आणि मगच प्रभादेवी पुलाचे पाडकाम करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. पुनर्वसनासह इतर प्रश्न मार्गी लागल्याशिवाय पूल बंद करू देणार नाही, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.
दोन इमारती बाधित
एमएमआरडीए शिवडी-वरळी उन्नत रस्ता बांधत असून त्यासाठी प्रभादेवी रेल्वे पूल पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पुलाची बांधणी केली जाणार आहे. हा पूल बंद करून पुलाचे पाडकाम आणि नवीन बांधकाम करण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी २० महिन्यांसाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र दिले आहे. त्यानुसार मंगळवारी, १५ एप्रिल रोजी हा पूल बंद करण्यात येणार होता. मात्र सूचना-हरकतींच्या सुनावणीची प्रक्रिया न झाल्याने मंगळवारी पूल बंद करण्याचा निर्णय तात्पुरता पुढे ढकलण्यात आला असून येत्या चार-पाच दिवसांत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
हा पूल बंद करत त्याचे पाडकाम करण्यास आता राजकीय पक्षांकडून विरोध होऊ लागला आहे. शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनीही पुलाचे पाडकाम पुढे ढकलण्याची मागणी एका पत्राद्वारे नुकतीच एमएमआरडीएकडे केली आहे. तर दुसरीकडे मनसेनेही आता पुलाच्या पाडकामास विरोध करीत मंगळवारी सकाळी प्रभादेवी पूल येथे आंदोलन केले. मनसेचे शाखाध्यक्ष मंगेश कसालकर यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करण्यात आले.
नवीन पुलाच्या पूर्णत्वाची तारीख जाहीर करावी
प्रभादेवी पुलाचे पाडकाम करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला खरा, पण नवीन द्विस्तरीय पुलाचे खांब उभारण्यात येणाऱ्या ठिकाणी लक्ष्मी आणि हाजी नुरानी या इमारती आहेत. या इमारतींच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप निकाली लागलेला नाही. असे असताना हा पूल पाडण्याची एमएमआरडीएला घाई का असा प्रश्न कसालकर यांनी उपस्थित केला आहे.
पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावल्यानंतरच पुलाचे पाडकाम करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात मोठ्या संख्येने सूचना-हरकती सादर करण्यात आल्या आहेत. आमच्या हरकतींचा विचार न करता पुलाचे पाडकाम करण्याची घाई का करण्यात येत आहे, असा प्रश्न त्यांनी वाहतूक पोलिसांना केला आहे. तसेच नागरिक, वाहतुकीला योग्य पर्यायी मार्ग द्यावा, नवीन पुलाच्या पूर्णत्वाची निश्चित तारीख जाहीर करावी आणि त्यानंतरच पूल पाडावा, अशीही मागणी त्यांनी केली.