लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या १७ मे रोजी दादरच्या शिवाजी पार्क मैदानात सभा घेण्यासाठी नगरविकास विभागाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला परवानगी दिली आहे. नगरविकास विभागाने तसे पत्र मुंबई महापालिका प्रशासनाला पाठवले आहे. त्यामुळे येत्या १७ मे रोजी शिवाजी पार्क मैदानात सभेचे आयोजन करण्याचा महायुतीचा (भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना) मार्ग मोकळा झाला आहे. तर शिवाजी पार्कवर सभा घेण्याचे ठाकरे गटाची परंपरा आणि स्वप्न भंगले आहे.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी येत्या २० मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे. मतदानाला आता अवघे १२-१३ दिवस उरले आहेत. मुंबईत आता प्रचाराला रंग चढू लागला आहे. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन पक्षांनी महापालिकेला अर्ज दिले होते. त्यामुळे कोणाला सभेसाठी परवानगी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र नगरविकास विभागाने १७ मे रोजी शिवाजी पार्क मैदानात सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लेखी परवानगी दिली आहे. नगरविकास विभागाने परवानगीचे पत्र पालिका प्रशासनाला दिले असून पालिका प्रशासनाने मनसेच्या नेत्यांकडे हे परवानगी पत्र दिले आहे. परवानगी पत्राची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. त्यामुळे १७ मे रोजी महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा शिवाजी पार्कवर होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले नसले तरी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.

आणखी वाचा-२,००० कुटुंबांना पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, उच्च न्यायालयाकडून महापालिकेची कानउघाडणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी १८ मार्च रोजी परवानगीसाठी अर्ज दिला होता. याच दिवशी शिवसेनेच्या ठाकरे गटानेही अर्ज दिला होता. मात्र आम्ही अर्ज आधी दिला होता, असा दावा किल्लेदार यांनी केला आहे. पालिकेच्या नियमानुसार ज्याचा अर्ज आधी येतो त्याला परवानगी दिली जाते. आमच्या पत्राचा इनवर्ड क्रमांक आधीचा आहे. आमच्यानंतर ठाकरे गटाने परवानगीसाठी अर्ज केला होता. त्यामुळे परवानगी आम्हाला मिळेल अशी आम्हाला खात्री होती, असा दावा किल्लेदार यांनी केला आहे. शिवाजी पार्क मैदान ही कोणाची मक्तेदारी नाही, ते सार्वजनिक मैदान आहे. शिवसेना इतकी वर्षे सत्तेत होती त्यांना नियम माहीत नाही का, असाही सवाल त्यांनी केला आहे.

आणखी वाचा-पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घराच्या ताब्याची प्रतीक्षा लांबली, घरे तयार, पण भोगवटा प्रमाणपत्राअभावी ताबा रखडला

या अटींवर मैदानाला परवानगी

ध्वनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी, ध्वनी प्रदूषणाच्या कायद्याचे पालन करावे, उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे पालन करावे, आवश्यक तेथे पोलिसांची परवानगी घ्यावी, अशा अटींवर नेहमीप्रमाणे ही परवानगी देण्यात आली आहे.

Story img Loader