मनसेने काही महिन्यांपूर्वी आंदोलन करत उपस्थित केलेला मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिवाळीतील फटाक्यांमुळे त्रास होत असल्याची तक्रार काही मुस्लीम व्यक्तींनी केल्यानंतर मनसेने त्यांना जाहीर इशाराच दिला आहे. मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी हिंदूंनी एकटवण्याचं आवाहन केलं असताना, अमेय खोपकर यांनी तर त्रास होत असेल तर देश सोडून निघून जा असं सुनावलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय झालं?

ट्विटरला एका मुस्लीम व्यक्तीने पोलिसांना टॅग करत रात्रीच्या वेळी फटाके वाजत असल्याची तक्रार केली होती. सलमान खान नावाच्या व्यक्तीने रात्रीचे दोन वाजले तरी कांदिवलीतील गणेश नगर येथे फटाके फोडले जात असल्याचं ट्वीट करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. तर दुसऱ्या एका ट्वीटमध्ये केनिल नावाच्या व्यक्तीने पहाटे ४.३० वाजता फटाके फोडले जात असल्याची तक्रार केली होती. मुंबई पोलिसांनी या दोन्ही ट्वीटरला उत्तर देत संबंधितांना कळवण्यता आल्याचं सांगितलं होतं.

‘रात्रीचे १ वाजले तरी फटाके वाजवतायत’, पोलिसांकडे तक्रार करणाऱ्या मुस्लिमांना मनेसेने सुनावलं, म्हणाले “तुमची भोंग्यावरील अजान…”

मनोज चव्हाण यांनी या ट्विटचे स्क्रीनशॉट शेअऱ केले असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल. आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होत आहे. आम्ही रोज फटाके फोडत नाही, मात्र तुमची अजान अजूनही अनेक ठिकाणी भोंग्यावर सुरू आहे. थोडं सहन करा कारण दिवाळी आहे,” असं ते म्हणाले आहेत.

अमेय खोपकरांचा इशारा

“ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय, देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात राहायची गरजच नाही. आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच. आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा,” असं ट्वीट अमेय खोपकर यांनी केलं आहे.

‘हिंदू एकटवला पाहिजे, तरच प्रत्युत्तर देता येईल’

“ट्विट पाहून माझी तळपायाची आग मस्तकात गेली. देवाच्या नावाखाली वर्षानुवर्ष आम्ही यांचे अजान ऐकत आहोत, आम्ही ते सहन करतोय ना. दिवाळी तर फक्त चार दिवस असते. काल पहिला दिवस असल्याने पहाटे लोक उठणारच. त्यांना इतका त्रास होत असेल तर त्यांच्या अजानचा आम्हाला किती त्रास होतो हे पाहिलं पाहिजे. माझा विषयच हा होता की, जसे हे सगळे एकत्र येतात आणि पोलिसांना ट्वीट करणं वैगेरे गोष्टी करतात. तशाच प्रकारे हिंदूही एकवटणं गरजेचं आहे. आपण एकवटलो तरच प्रत्युत्तर देता येईल,” असं मनोज चव्हाण यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं.

“आजही काही ठिकाणी हट्टापायी अजान सुरु आहे. त्यांनीही हा त्रास समजून घेण्याची गरज आहे. जर पोलिसांनी कारवाई केली तर त्याच्या पाठीशी मनसे ताकदीने उभी राहणार. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अशा तक्रारींकडे लक्ष देऊ नये,” असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं.

मनसे आणि शिंदे गटाची युती? CM एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची ‘शिवतीर्थ’वर भेट

पुढे ते म्हणाले की “हिंदू एकटवणं, एकत्रित येऊन सण साजरे करणं हीच राज ठाकरेंची भूमिका आहे, म्हणूनच दिपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. फटाके काही १२ महिने वाजत नसतात. सणाच्या दिवशी आनंद व्यक्त करण्याची ती पद्धत असून प्रत्येकाला ते स्वातंत्र्य आहे. यावर निदान हिंदूंनी तरी आक्षेप घेऊ नये”. अशा तक्रारींना थारा दिला जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

“अजान बंद करा अशी विनंती आता सरकारच करणार असल्याचं आम्हाला समजलं आहे. आम्ही पहाटेची आऱतीही बंद केली आहे. हा निर्णय एकट्या समाज किंवा धर्मापुरता नाही. हिंदू देवी, देवतांच्या मंदिरातही हा नियम पाळण्यात आला आहे. जर आम्ही मान दिला आहे, तर मुस्लिम समाजानेही तो मान द्यावा,” असं ते म्हणाले आहेत.

“हिंदुत्ववादी सरकार आलं आहे असा विश्वास द्यायचा असेल तर कारवाई होणं गरजेचं आहे. १०० टक्के बंद झालं तरच हिंदुत्ववादी सरकार महाराष्ट्रात आलं आहे असं म्हणू शकतो,” असं त्यांनी सांगितलं.

पुढे त्यांनी सांगितलं की “जी विचारधारा चुकीची आहे आम्ही तिचा निषेध करतो. दिवाळीनंतर मी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. आपला देश कुठे जातोय हे पुराव्यानिशी सांगणार आहे. हिंदुत्ववादी संघटना किंवा हिंदूंनी एकत्र येणं गरजेचं आहे. कारण जर ‘इस्लाम खतरे में है’ अशी बांग आली तर १२ देश पाठीशी उभे राहतील. पण जर हिंदुत्व धोक्यात असेल तर मदतीला फक्त नेपाळ आहे, इतर कोणी संघटना नाही. त्यामुळे हिंदूंनी एकटवणं, एकत्र सण साजरं करणं महत्त्वाचं आहे”.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns amey khopkar tweet diwali firecrackers muslims masjid loudspeaker sgy
Show comments