मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या १७ मे रोजी शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट या दोन पक्षांनी अर्ज केले आहेत. या अर्जांवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र राजकीय कुरघोडीतून सभेसाठी ठाकरे गटाला परवानगी मिळण्याची शक्यता कमी असल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटाने आता बीकेसी मैदानासाठी चाचपणी सुरू केली असल्याचे समजते. निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मैदान कोणाला मिळणार यावरून वाद रंगणार असल्याची चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभेच्या निवडणुकीसाठी येत्या २० मे रोजी मुंबईत मतदान होणार आहे. मतदानाला आता अवघे १२-१३ दिवस उरले असून मुंबईत राजकीय वातावरण तापले आहे. येत्या काही दिवसांत मुंबईत मोठ्या पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या राजकीय सभांचा धुरळा उडणार आहे हे निश्चित आहे. त्याकरिता राजकीय पक्षांनी अर्ज केले आहेत. येत्या १७ मे रोजी शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे या दोन पक्षांनी अर्ज दिले आहेत. त्यामुळे या दिवशी सभा घेण्यासाठी कोणाला परवानगी देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या पक्षांचे अर्ज आले आहेत त्यांच्या निवेदनासह परवानगीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असून राज्य सरकारने त्यावर अद्याप काहीच निर्णय कळविलेला नाही, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>तंबाखू आणि गुटख्यांच्या जाहिरातींविरोधातील याचिका निव्वळ प्रसिद्धीसाठी, उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर याचिका मागे

शिवाजी पार्क मैदान आणि राजकीय सभा यांचे जुने नाते आहे. त्यातही शिवसेनेशी हे नाते अधिक जोडलेले आहे. मात्र शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर होणारी ही पहिली निवडणूक असून यंदा शिवाजी पार्कचे मैदान प्रचारसभेसाठी मिळावे म्हणून सर्वच महत्त्वाच्या राजकीय पक्षांनी मुंबई महापालिकेकडे अर्ज केले आहेत. यात शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी (अजित पवार गट), भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या पक्षांच्या अर्जांचा समावेश आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी एकाच दिवसासाठी अर्ज केलेला असल्यामुळे येत्या काही दिवसांत उभयतांमध्ये वाद रंगण्याची चिन्हे आहेत. हे मैदान १७ मे रोजी उपलब्ध व्हावे यासाठी मनसेने आधी अर्ज दिला होता व ठाकरे गटाचा अर्ज नंतर आला होता असे पालिकेतील सूत्रांनी सांगितले.

शिवाजी पार्कचे मैदान प्रचारसभेसाठी मिळावे याकरिता राजकीय पक्षांमध्ये स्पर्धा लागली आहे. सर्वच महत्त्वाच्या पक्षांनी पालिकेकडे अर्ज केले आहेत.

बीकेसी मैदानाचाही पर्याय

मनसेने या निवडणुकीसाठी उमेदवार दिलेले नसले तरी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांची ही सभा महायुतीला पाठिंबा दर्शवणारी असणार हे निश्चित आहे. एकाच दिवसासाठी ठाकरे गट आणि मनसेने अर्ज दिल्यामुळे यावरून राजकीय वाद रंगण्याची चिन्हे आहेत. शिवाजी पार्क मैदान मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे ठाकरे गटाने बीकेसी येथील मैदानाचा पर्यायही ठेवला आहे. या मैदानासाठीही ठाकरे गटाने चाचपणी सुरू केल्याची माहिती ठाकरे गटातील सूत्रांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns and thackeray shiv sena square off for shivaji park ground amy