महाराष्ट्र नवनिर्माण सेना(मनसे) आणि टोलफोड यांचे नाते जूनेच आहे. राज्यात सध्या टोलविरोधी आंदोलनाचे वातावरण असताना त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल मागण्यासाठी कोणी आडवे आले, तर तुडवून काढा, असा आदेश दिल्यानंतर ‘टोल’फोड होणे सहाजिकच होते आणि झालेही तसेच.
मनसेच्या पदाधिकाऱयांनी आणि कार्यकर्त्यांनी राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी टोलनाक्यांची तोडफोड केली. ठाणे, ऐरोली, पुणे, नागपूर, औरंगाबाद येथील विविध टोलनाक्यांना कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले आणि तिथे तोडफोड केली.
टोलचा विषय पुढे आल्यावर गुंतवणुकीचा मुद्दा नेहमीच नेतेमंडळींकडून मांडला जातो. मनसेचे राज ठाकरे यांनी मागेही टोल विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. टोल भरू नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले होते. तसेच टोल नाक्यांवर वाहनांची गणती मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली होती.
यावेळस सत्ता परिवर्तन करावेच लागेल असा संदेश देत राज ठाकरेंनी याआधीही टोलसह इतर मुद्द्यांवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांशी बोलणं म्हणजे एकटय़ानेच बॅडमिंटन खेळण्यासारखे असल्याने त्यांच्याकडे एखादा विषय आपण तळमळीने त्यांच्याकडे मांडावा व उपाय सांगावा तर त्यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया नसते, असा टोला राज ठाकरे यांनी मारला होता. तसेच काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे एक टोक तर शरद पवार कधी काय बोलतील याचा नेम नाही. ते जे काही बोलतात ते सात-आठ महिन्यानंतर कळतं, असेही राज ठाकरे म्हणाले होते.
टोलच्या प्रश्नावर शरद पवारांनी सामंजस्याची भूमिका घेत टोलचे दर कमी करण्यावर आपले मत व्यक्त केले होते. तसेच टोलरद्द केल्याने गुंतवणुकीवर परिणाम होईल असेही शदर पवार म्हणाले होते. त्यात नवी मुंबईमध्ये पक्षाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱयाने यापुढे टोल भरायचा नाही, असा आदेशच रविवारी दिला. त्यामुळे टोलच्या बाबतीत मनसे कार्यकर्त्यांची पुढील भूमिका काय असेल यात कोणतही शंका निर्माण होण्याचे कारणच नव्हते.
ऐरोलीतील टोलनाका, पुण्यातील चांदणी चौकाजवळील टोलनाका, नागपूरमधील दाभ्याचा टोलनाका, सांगलीतील टोलनाका, बीडमधील आष्टी टोलनाका आणि औरंगाबादमधील करमाड टोलनाक्यावर मनसैनिकांनी रविवारी रात्री तोडफोड केली. सांगली-इस्लामपूर रोडवरील टोल नाक्यावर तर प्रत्येक वाहनचालकाला ‘आम्ही टोल देणार नाही’ या स्टिकरचे वाटप देखील करण्यात आले.
दहिसर मध्ये टोलविरोधात आंदोलन केल्याने मनसेचे नेते प्रवीण दरेकर, शालिनी ठाकरे आणि संजय घाडी यांना अटक करण्यात आली आहे. ‘राज’सैनिकांकडून ‘टोल’फोड सुरू झाल्याचे चित्र राज्यभरात रंगू लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा