पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे निम्म्या महाराष्ट्रातील जनता दुष्काळात होरपळत आहे. या पाश्र्वभूमीवर रंगपंचमीच्या निमित्ताने पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी २७ मार्च रोजी मुंबईत २५ टक्के पाणीकपात लागू करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. तर मनसे पाठोपाठ भाजपने ५० टक्के पाणीकपातीची मागणी केली आहे.
नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्याच्या अभावामुळे अनेकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना मुंबईत मात्र पाण्याची रेलचेल आहे. महापौर आणि पालिका आयुक्त यांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन जनतेला केले असले तरी दररोज मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा अपव्यय होता आहे. यंदा दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर रंगपंचमीच्या दिवशी मुंबईत पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी महापालिकेने २७ मार्च रोजी २५ टक्के पाणीकपात लागू करावी, अशी मागणी मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केली आहे. या संदर्भात संदीप देशपांडे यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना एक पत्र पाठवले आहे.
दरम्यान, होळी आणि रंगपंचमीच्या निमित्ताने मुंबईत पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होत असून २६ आणि २७ मार्च रोजी मुंबईत ५० टक्के पाणी कपात करावी, तसेच टँकरने पाणीपुरवठा करू नये अशी मागणी भाजपचे मुंबईचे सरचिटणीस संजय उपाध्यक्ष यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा