लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : दहिसर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजेश येरूणकर यांनी मतमोजणी आणि ईव्हीएम यंत्राच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. ते जिथे राहतात त्या परिसरातील मतदारयादीतील केवळ दोन मते त्यांना मिळाली आहेत. त्यामुळे त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून आपल्याला आपल्या घरातल्यांनीही मतदान केले नाही का, मला आई आणि बायकोनेही मतदान केले नाही का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी याबाबत केलेली ध्वनिचित्रफीत मोठ्या प्रमाणावर फिरू लागली आहे.
दहिसर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान आमदार मनीषा चौधरी, शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) उमेदवार विनोद घोसाळकर आणि मनसेचे राजेश येरूणकर यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघातून मनीषा चौधरी या तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांना ५८ हजार ५८७ मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर घोसाळकर असून त्यांना ५४ हजार २५८ मते मिळाली. येरूणकर यांना पाच हजार ४५६ मते मिळाली आहेत. मात्र येरूणकर हे स्वत: ज्या परिसरात राहतात तेथील मतदारयादीतील मतदान केंद्रावर त्यांना एक हजार मतदारांमधून केवळ दोनच मते मिळाली आहेत. त्यामुळे त्यांनी आक्षेप घेतला असून याबाबतची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवर टाकली आहे.
आणखी वाचा-निवडणुकांवर ऑनलाईन सट्टेबाजी करणाऱ्या फेअरप्ले ॲपशी संबंधीत ईडीची मोठी कारवाई
याबाबत येरूणकर यांनी सांगितले की, त्यांनी मतमोजणी केंद्रावरच याबाबतचा आक्षेप घेतला होता व त्याबाबतचा अर्जही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दिला होता. मात्र अधिकाऱ्यांनी आमचे काही ऐकून घेतले नाही वर आम्हाला अटक करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आम्ही तिथून बाहेर पडलो. माझ्या घरात मी, माझी बायको, मुलगी, आई असे चार मतदार आहोत. मग माझ्या घरच्यांनीच मला मतदान केले नाही का, असा सवाल येरूणकर यांनी केला आहे.
आणखी वाचा-मेट्रो ३ : आरे – बीकेसी मार्गिकेवर तांत्रिक अडचणींची मालिका सुरूच
मतमोजणीच्या वेळी एका मतदान यंत्राच्या तीन सिलपैकी एकच सिल होते. त्यावरही आम्ही आक्षेप घेतला होता. तसेच काही यंत्रांची बॅटरी उतरलेली होती, तर काही यंत्राची बॅटरी पूर्ण ९९ टक्के होती हे कसे काय, असेही प्रश्न येरूणकर यांनी उपस्थित केले आहेत. चौधरी यांच्याबाबत दहिसरमधील काही वसाहतींमध्ये असंतोष होता, त्यांना ज्या वसाहतींमध्ये मतदारांनी प्रचारही करू दिला नाही. त्या मतदारसंघात चौधरी यांना मताधिक्य कसे काय मिळाले, असाही सवाल येरूणकर यांनी केला आहे.