लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या उमेदवाराला गेल्या विधानसभा निवडणूकीत जेवढी मते मिळाली अगदी तेवढीच मते त्यांना २०२४च्या विधानसभा निवडणुकीत मिळाली आहेत. या योगायोगाबद्दल मनसेच्या उमेदवाराने आश्चर्य व्यक्त केले आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांना ५,०३७ मते मिळाली आहेत. त्यामुळे वर्सोवात ‘ईव्हीएम बेवफा है’ असे फलक लावण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणूक पार पडून शपथविधीही झालेला असला तरी विरोधकांकडून मतमोजणी व निकालावर संशय व्यक्त केला जात आहे. महायुतीला घवघवीत यश मिळाल्यामुळे विरोधकांच्या या पराभवाला ईव्हीएम जबाबदार असल्याची सर्वच पक्षांकडून तक्रार केली जात आहे. वर्सोव्यातील मनसेचे उमेदवार संदेश देसाई यांना या विधानसभा निवडणुकीत ५०३७ मते मिळाली. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीतही त्यांना तेवढीच मते मिळाली होती.
आणखी वाचा- झोपु कायद्याच्या कठोर अंमलबजावणीत १०० हून अधिक समस्यांचा अडसर, उच्च न्यायालयात अहवाल
त्यामुळे मनसेकडून देखील ईव्हीएम विरोधात आक्रमक पवित्रा घेत वर्सोवा परिसरात फलक लावण्यात आले आहेत. ‘ईव्हीएम बेवफा है’ असा मजकूर असलेले फलक मनसेचे पराभूत उमेदवार संदेश देसाई यांनी लावले आहेत. २०१९ च्या निवडणुकीइतकीच मते २०२४ निवडणुकीत देखील मिळाल्याने ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे. शिवाय, निवडणूक अधिकाऱ्याकडे उद्या यासंदर्भात तक्रार देखील करणार असल्याचे देसाई यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा- कर परताव्यातील विलंबामुळे सरकारी तिजोरीवर व्याजाचा वाढता बोजा, उच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त
दहिसर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजेश येरूणकर यांनीही काही दिवसांपूर्वी मतमोजणी आणि ‘ईव्हीएम’ मशीनच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला होता. त्या पाठोपाठ आता देसाई यांनीही आरोप केला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना ईव्हीएम विरोधात पुरावे गोळा करण्याचेही आदेश दिले होते. त्यामुळे देसाई यांच्या आरोपांना महत्त्व आले आहे.