धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने सध्या राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प अदाणींना सोपवल्याचा निषेध करत उद्धव ठाकरे गटानं दोन दिवसांपूर्वी मुंबईत मोर्चा काढला होता. त्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात आपली भूमिका मांडली आहे. तसेच, ठाकरे गटाच्या मोर्चाबाबतही त्यांनी खोचक टिप्पणी केली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरेंनी धारावी पुनर्विकास प्रकल्प अदाणींना देण्याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला. “मोठा प्रकल्प मुंबईत येतोय. तो मुळात परस्पर अदाणींना का दिला? इथपासून सगळं सुरू होतंय. अदाणींकडे असं काय आहे ज्यामुळे विमानतळ, कोळसा अशा सर्व गोष्टी तेच हाताळू शकतात? टाटांसारख्या इतरही अनेक मोठ्या कंपन्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी तुम्ही त्यांच्याकडून डिझाईन्स मागवायला हवे होते. टेंडर्स काढायला हवे होते. तिथे नेमकं काय होणार आहे ते कळायला हवं होतं. पण ते झालं नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.
“आत्ता जाग का आली?”
दरम्यान, यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे गटाच्या मोर्चावरही टीकास्र सोडलं. “मला फक्त प्रश्न एवढाच आहे की आत्ता महाविकास आघाडीच्या नेत्यांना का जाग आली? हे जाहीर होऊन ८ ते १० महिने झाले असतील. पण मग आज का मोर्चा काढला? सेटलमेंट व्यवस्थित होत नाही म्हणून का?” असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.
“टाऊन प्लॅनिंग नावाची गोष्ट असते की नाही?”
“एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी एक मोकळी जागा लागते. खूप मोठा भाग आहे तो. तिथे किती शाळा, कॉलेजेस होणार आहेत? कसे रस्ते होणार आहेत? इमारतींमध्ये राहणारी माणसं किती आहेत? किती इमारती होणार आहेत? कोणकोणत्या संस्था येणार आहेत? हे सगळं सांगावं लागतं. टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्ट सांगावी लागते की नाही? कि फक्त एखादा भाग घ्यायचा आणि सांगायचं की हा अदाणींना देऊन टाकला. असं थोडी असतं. आणि हे मोर्चा काढणारे ८ ते १० महिन्यांनी जागे झाले आहेत. यांनी हा प्रश्न विचारला का की नेमकं काय होणार आहे तिकडे? की फक्त मोर्चा काढून दबाव आणून सेटलमेंट करायच्या आहेत?” असा सवालही राज ठाकरेंनी केला.