मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (१२ जून) सोशल मीडियावर पोस्ट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. राज ठाकरे यांनी पुण्यातील आपल्या सभेचा उल्लेख करत मनसैनिकांना त्यांच्या शस्त्रक्रियेचे आठवण करून दिली. त्यांनी आपल्या शरीरात ‘कोविड डेड सेल’ असल्यानं घरी क्वारंटाईन असल्याची माहिती देत शस्त्रक्रियेसाठी यंदा वाढदिवसानिमित्त १४ जूनला मी कोणालाही भेटू शकत नसल्याचंही नमूद केलं.

राज ठाकरे म्हणाले, “माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, पुण्यातील सभेत मी सर्वांना सांगितलं की माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे. मी जेव्हा रुग्णालयात दाखल झालो तेव्हा चाचणीनंतर डॉक्टरांनी ‘कोविडचा डेड सेल’ असल्याचं सांगितलं. ते काय आहे हे मला माहिती नाही, पण ती शस्त्रक्रिया रद्द झाली. आता मी कोविडमुळे १०-१५ दिवस घरी क्वारंटाईन आहे. या सगळ्या दरम्यान १४ जूनला माझा वाढदिवस आला आहे. दरवर्षी तुम्ही सर्वजण प्रेमाने उत्साहाने मला भेटायला येतात. मी देखील आपली सर्वांची आतुरतेने वाट पाहत असतो. सर्वांना भेटल्यावर बरं वाटतं.”

“मी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही”

“असं असलं तरी यावर्षी १४ जूनला मला कोणालाच भेटता येणार नाही. कारण या गाठीभेटींमध्ये पुन्हा संसर्ग झाला आणि परत शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली तर शेवटी मी शस्त्रक्रिया किती पुढे ढकलायची यालाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरली आहे. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही. म्हणून मी १४ जूनला कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा : Raj Thackeray Non Bailable Warrant: राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

“आपण जिथे आहात तिथेच राहा. माझी शस्त्रक्रिया पूर्ण होईल आणि बरं वाटायला लागेल तेव्हा मी आपणा सर्वांना निश्चित भेटेन. त्यामुळे १४ जूनला आपण कोणीही घरी येऊ नये ही विनंती,” असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.

Story img Loader