MNS Raj thackeray meets CM Eknath Shinde : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आज भेट घेतली. यावेळी मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर हेदेखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार भेटी-गाठी झालेल्या आहेत. आज होणारी भेट ही सहावी भेट असल्याचे सांगितले जाते. तसेच बंद दाराआड दोन्ही नेत्यांनी अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे या वारंवार होणाऱ्या बैठकामागे राजकीय कारण आहे की? इतर काही प्रश्न, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उदघाटन होणार आहे. दोन दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौरा करणार आहेत. तसेच कालच राज ठाकरे यांनाही राम मंदिर उदघाटन सोहळ्याचे निमंत्रिण मिळणार असल्याची बातमी आली होती. याआधी राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा करण्याची घोषणा केली होती. मात्र भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी जोरदार प्रतिकार केल्यामुळे राज ठाकरे यांना आपला अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. आता ते पुन्हा अयोध्येत जाण्याचा प्रयत्न करणार का? असा एक प्रश्न आहे.
तसेच मराठी पाट्या आणि टोल नाके या विषयांचा मनसे खूप आधीपासून पाठपुरावा करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांची याचिका फेटाळून लावल्यानंतर दुकानांवर मराठी पाट्या लवकर लावाव्यात तसेच या आदेशाची अवहेलना करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मनसेची जुनी मागणी आहे. त्याचाही पाठपुरावा या बैठकीत घेतला गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
यासोबतच काही दिवसांपूर्वी उबाठा शिवसेना गटाने धारावी पुर्नविकास प्रकल्पाचे काम अदाणी समूहाला दिल्याबद्दल मोर्चा काढला होता. अदाणी समूहाऐवजी सरकारने पुर्नविकास करावा, अशी मागणी करण्यात आली होती. या मोर्चानंतर राज ठाकरे यांनीही अदाणी समूहालाच सर्व कामे कशी काय मिळतात? याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.
“मोठा प्रकल्प मुंबईत येतोय. तो मुळात परस्पर अदाणींना का दिला? इथपासून सगळं सुरू होतंय. अदाणींकडे असं काय आहे ज्यामुळे विमानतळ, कोळसा अशा सर्व गोष्टी तेच हाताळू शकतात? टाटांसारख्या इतरही अनेक मोठ्या कंपन्या आहेत. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी तुम्ही त्यांच्याकडून डिझाईन्स मागवायला हवे होते. टेंडर्स काढायला हवे होते. तिथे नेमकं काय होणार आहे ते कळायला हवं होतं. पण ते झालं नाही”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती.
दरम्यान यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या मोर्चावरही टीकास्र सोडलं होतं. “मला फक्त प्रश्न एवढाच आहे की आत्ता महाविकास आघाडीच्या नेत्यांना का जाग आली? हे जाहीर होऊन ८ ते १० महिने झाले असतील. पण मग आज का मोर्चा काढला? सेटलमेंट व्यवस्थित होत नाही म्हणून का?” असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता.