बॉलिवूडचा अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानी रविवारी सकाळी दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये असलेल्या सलमानच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला अतिरिक्त सुरक्षा पुरविण्याचे आणि हल्लेखोरांना तात्काळ पकडण्याचे आश्वासन दिले. तसेच आज दिवसभर विविध नेते आणि सेलिब्रिटिंनी सलमान खानची भेट घेतली. यामध्ये मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचाही समावेश होता.

राज ठाकरे आणि सलमान खान आणि वडील सलीम खान यांचे पूर्वीपासून चांगले संबंध आहेत. यापूर्वीही अनेकदा राज ठाकरे यांनी वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जाऊन खान कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. आजही सलमान खान यांची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे घरी पोहोचले. तसेच वांद्रे विधानसभेचे माजी आमदार बाबा सिद्दीकी, वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी यांनीही सलमान खानची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

दरम्यान गोळीबार प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. हल्लेखोरांचे सीसीटीव्ही चित्रण आणि फोटो पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरून आता तपासाचा वेग वाढला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन्ही हल्लेखोरांचे फोटो आता प्रसिद्ध केले आहेत.

bandra firing salman khan
मुंबई पोलिसांनी हल्लेखोरांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत.

बिश्नोई गँगने घेतली हल्ल्याची जबाबदारी

सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली असल्याचे समजते. सध्या तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याची तथाकथित फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये गोळीबाराचा उल्लेख करून सलमान खानला पुन्हा धमकविण्यात आले आहे.

अनमोल बिश्नोई या नावाने व्हायरल होत असलेल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे, “आज झालेला गोळीबार हा फक्त ट्रेलर होता.” गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणे आणि सलमान खानला धमकावणे असा या पोस्टचा उद्देश दिसतो. पहाटे गोळीबार झाल्यानंतर जवळपास पाच तासांनी सकाळी ११.३० वाजता सदर पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. बिश्नोई गँगचा म्होरक्या लाँरेन्स बिश्नोई सध्या तुरुंगात आहे. त्याचा भाऊ असलेल्या अनमोल बिश्नोईने सदर पोस्ट टाकले असल्याचे सांगितले जाते. पोलीस आता या व्हायरल पोस्टचे मुळ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Story img Loader