येत्या २२ मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं पक्षाच्या पाडवा मेळाव्यात भाषण होणार आहे. या भाषणात राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सविस्तर भूमिका मांडणार असल्याचं राज ठाकरेंनी ९ मार्च रोजी मनसेच्या वर्धापन दिनी केलेल्या भाषणात सांगितलं आहे. त्यामुळे या भाषणाकडेन राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरेंचं हे भाषण होण्याआधीच त्यांचं अजून एक विधान चर्चेत आलं आहे. मुंबईत ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या टीझर लाँच कार्यक्रमात राज ठाकरे आले असता त्यांनी केलेलं हे विधान उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकवून गेलं.
२८ तारखेला चित्रपट होणार प्रदर्शित
येत्या २८ मार्च रोजी महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट प्रदर्शित होणार असून अंकुश चौधरी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात अजय-अतुल यांचीच गाणी असू शकत होती, असं म्हणत राज ठाकरेंनी अजय-अतुल यांच्या गाण्यांचं कौतुक केलं आहे. मात्र, २८ मार्चला आपण चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी हजर राहू शकत नाही, असं सांगताना राज ठाकरेंनी आपली अवस्था दहावी नापास विद्यार्थ्यांसारखी झाल्याचं नमूद केलं.
“२८ तारखेला चित्रपट प्रदर्शित होतोय. पण २८ तारखेला मी इथे नाहीये. मी बाहेरगावी जातोय. आम्ही सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखे आहोत. आमच्या निवडणुका नेमक्या कधी लागणार? मार्च की ऑक्टोबर? असं सध्या चालू आहे. त्यामुळे बहुधा सध्या मला दहावी नापास झाल्यासारखंच वाटतंय. कधी? ऑक्टोबर बहुधा. ऑक्टोबर आल्यानंतर मग कधी? मार्च बहुधा. त्यामुळे आमचं सध्या दहावी नापास झाल्यासारखं चालू आहे”, असं राज ठाकरेंनी म्हणताच उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
“निवडणूक वातावरणात असते, पण सध्या…”
“निवडणूक नुसती येत नसते, ती वातावरणात असते. त्यामुळे सध्या निवडणूक मला वातावरणात काही दिसत नाहीये. त्यामुळे मध्ये थोडीशी गॅप मिळाली तर त्यात मी बाहेरगावी जाऊन येतोय. गेल्या ४-५ वर्षांपासून मी कुठेच बाहेरगावी गेलो नाही. त्यामुळे म्हटलं जरा बाहेरगावी जावं. नातू झालाय, त्यालाही बाहेर घेऊन जायचं होतं”, असं राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.