मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका डोळय़ासमोर ठेवून पक्षवाढीसाठी कामाला लागण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार ग्रामीण भागात कृषी विभाग आणि सहकार क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याचे तसेच शहरी भागात नाका तिथे शाखा सुरू करम्ण्याचे आदेशही ठाकरे यांनी दिले आहेत.

रविंद्र नाटय़मंदिर येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे बोलत होते. बैठकीत पक्षाचे नेते, सरचिटणीस तसेच मुंबई आणि इतर जिल्हातील जिल्हाध्यक्ष, विभाग अध्यक्ष, तालुका अध्यक्षांसह इतर प्रमुख नेते होते. ठाकरे यांनी बैठकीत मुंबई आणि इतर प्रमुख शहरांमधील जिल्हाध्यक्षांना जनसंपर्क वाढविण्याची सूचना करताना प्रामुख्याने नाका तिथे शाखा सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच सर्वसामान्य नागरिकांशी संपर्क वाढविण्याची सूचना करण्यात आल्याचे समजते. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घ्या. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात शेतीचा दवाखाना सुरू करण्याची सूचना करण्यात आली असून तेथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यात मातीचा नमुना तपासणे, पिकांची माहिती देणे, खतांसंदर्भात मार्गदर्शन करणे आणि इतर अनेक बाबींचा समावेश असणार आहे. या शेतीचा दवाखान्याबरोबर प्रत्येक जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील विविध माहिती देण्यासाठी कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Story img Loader