महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी प्लॅनेट मराठी प्रस्तुत ‘अथांग’ वेब मालिकेच्या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. यावेळेस अभिनेत्री तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान चित्रपट निर्मिती ही आवड असल्यामुळे आपला चित्रपटांकडे किंवा मनोरंजनाकडे अधिक कल आहे, असे सांगत राज यांनी एक मोठी घोषणा केली. लवकरच आपण छत्रपती शिवाजीमहाराजांवर तीन भागांमध्ये चित्रपट करणार असल्याची घोषणा राज यांनी केली. मात्र याचवेळी राज यांनी निवडणुकांसंदर्भातही खोचक शब्दांमध्ये भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> “मी राजकारणात अपघाताने आलो, माझं पाहिलं पॅशन…”; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो तिथे कसलाच थांगपत्ता लागत नाही आणि आज मी थेट ‘अथांग’ वेब मालिकेच्या झलक प्रसिद्धीच्या सोहळ्यासाठी आलो आहे, असे राज यांनी मुलाखतीमध्ये मिश्किलपणे म्हटले. यावेळी राज यांनी आपला चित्रपटांकडे आणि मनोरंजन क्षेत्रातील निर्मितीकडे अधिक कल असल्याचं सांगितलं. मात्र राजकीय वाटचाल करताना वेळ मिळत नाही अशी खंतही राज यांनी बोलून दाखवली.

राज ठाकरेंनी एकामागे एक निवडणूक सतत सुरु असतात असं सांगताना याच कारणामुळे चित्रपट निर्मितीसारख्या गोष्टीची आवड असूनही वेळ देता येत नाही असं म्हटलं. “काय आपल्या देशामध्ये अडचण ही आहे की देशात निवडणुका हा एक धंदा आहे आणि त्या संपतच नाहीत. ही झाली की ती. ती झाली की ती. त्यामुळे मला या विषयाकडे लक्ष द्यायला, वेळ द्यायला मिळत नाही. तसा जर वेळ मिळाला तर मी निश्चितच करणार आहे,” असं राज म्हणाले.

तसेच छत्रपती शिवाजीमहाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच बनवणार असल्याची घोषणा राज यांनी यावेळी केली. “सध्या एक डोक्यामध्ये सुरु आहे. मात्र आताच शिवाजीमहाराजांवरती इतके चित्रपट येऊन गेले आहेत की मला आता हिंमत होत नाही त्याला हात लावायची. मात्र मी कॉलेजमध्ये असताना गांधी चित्रपट पाहत असे तेव्हा मला वाटायचं की महाराजांवरती इतका मोठा चित्रपट झाला पाहिजे. माझं आता त्यावर काम सुरु आहे. मला असं वाटतं की तीन भागांमध्ये हा चित्रपट येईल,” असं राज म्हणाले.

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात छत्रपती शिवाजीमहाराजांची भूमिका अभिनेता अक्षय कुमार साकारणार असल्याने आता राज ठाकरे यांचा मराठी बाणा कुठे गेला, असा प्रश्न विचारणाऱ्यांना राज ठाकरेंनी काहीही झालं तरी मी कट्टर मराठी आहे, असे उत्तर दिले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray says election is business in india i do not get time for film production scsg
Show comments