मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अर्थात २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मराठी भाषादिनानिमित्त मनसेने दादरमध्ये स्वाक्षरी मोहिमेचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी हजेरी लावली. मात्र त्यावेळी राज यांनी तोंडावर मास्क घातला नव्हता. याचसंदर्भात त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी अगदी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं.

दादरमध्ये मनसेने आयोजित केलेल्या मराठी स्वाक्षरी मोहिमेसाठी अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वाक्षरी मोहिमेच्या फलकावर राज यांनी स्वाक्षरी केल्यानंतर पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना राज ठाकरे यांनी उत्तरं दिली. यावेळी एका पत्रकाराने राज यांना तुम्ही मास्क घातलं नाही असं प्रश्न विचारला. यावर राज यांनी खोचक टकाक्ष टाकत, “मी घालत पण नाही,” असं उत्तर दिलं. तसेच पुढे त्यांनी, “मी तुम्हालाही सांगतो,” असं म्हणत तिथून निघून गेले.

यापूर्वीही राज यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २०२० साली मे महिन्यामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती तिथेही मास्क न घालताच हजेरी लावली होती. राज यांच्या पाठोपाठ लगेचच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणवीसही मंत्रालयामध्ये दाखल झाले. फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर होते. या दोघांनाही नियमांचे पालन करत मास्क घातल्याचे चित्र दिसले. मात्र राज यांनी मास्क बंधनकारक असतानाही घातलं नव्हतं. याचसंदर्भात पत्रकारांनी नंतर प्रश्न विचारला असता राज यांनी, “सगळ्यांनी मास्क लावला आहे, म्हणून मी लावला नाही”, असं उत्तर दिलं होतं.

याचवेळी राज यांना परवानगी नसताना राज यांना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्यासंदर्भात प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना राज यांनी, “बाकीच्या सगळ्या कार्यक्रमांना गर्दी होते, सरकारच्या कार्यक्रमाला गर्दी होते. सरकारमधील मंत्री सगळ्या कार्यक्रमांमध्ये धुडगूस घालू शकतात गर्दी करुन आणि शिवजयंतीला तुम्ही नकार देता. मराठी भाषा दिनाला नकार देता. एवढं करोनाचं संकट समोर येतंय असं वाटत असेल तर सगळ्या निवडणुका पुढे ढकला. जाहीर केल्या जाणाऱ्या सर्व निवडणुका पुढे ढकला,” अशी मागणी केली.

२७ फेब्रुवारी हा कवीवर्य कुसुमाग्रज अर्थात विष्णु वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने दरवर्षी मनसेकडून कार्यक्रम केले जातात. या वर्षी खुद्द राज ठाकरेंनी जाहीर पत्राद्वारे ‘मराठी स्वाक्षरी मोहिमे’चं आवाहन केलं. मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून राज ठाकरेंच्या सहीनिशी हे पत्र पोस्ट करण्यात आलं. त्यानंतर आज दादरमध्ये ही स्वाक्षरीची मोहीम घेण्यात आली. या कार्यक्रमाला अमेय खोपकर, अवधुत गुप्ते, सायली शिंदेसहीत अनेक मराठी कलाकार उपस्थित होते.

Story img Loader