Raj Thackeray Gudi Padwa Melava Speech Mumbai: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी २०१९च्या निवडणुकांमध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’ स्टाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सभांमधून हल्लाबोल केला होता. तेव्हापासून त्याची व्हिडीओ लावायची पद्धत राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. आज मनसेच्या पाडवा मेळाव्यात पुन्हा एकदा राज ठाकरेंनी एक व्हिडीओ दाखवून विद्यमान एकनाथ शिंदे सरकार, मुंबईचे पोलीस आयुक्त आणि पालिका आयुक्त यांना इशारा दिला आहे. माहीमच्या समुद्रातला हा ड्रोनद्वारे काढलेला व्हिडीओ आहे. राज ठाकरेंनी हा व्हिडीओ दाखवल्यानंतर त्यात तथ्य आढळल्यास कारवाई करण्याची पोलीस प्रशासनानं तयारी केल्याचं सांगितलं जात आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
“महाराष्ट्रात अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या गोष्टींकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं. सगळ्यांचं राजकारणाकडे लक्ष. पण दोन-अडीच वर्षांपूर्वी सुरू झालेली एक गोष्ट मला महाराष्ट्र सरकारला दाखवायची आहे. मी मध्यंतरी माहीमच्या बाजूला कुणाकडे तरी गेलो होतो. समोर समुद्रात मला लोक दिसले. काय ते समजेना. मग मी एकाला सांगितलं जरा बघ काय आहे ते. मग त्या माणसाने ड्रोनवरून शूट करून माझ्याकडे काही क्लिप्स आणल्या. आपण समाज म्हणून अशा गोष्टींकडे पाहात नाहीत. त्याकडे आपलं लक्ष जात नाहीत. तुमच्या भागांमध्येही तुमचं लक्ष असलं पाहिजे की आसपास काय घडतंय. या देशाची घटना मानणाऱ्या मुसलमानांना मला विचारायचंय की जे मी दाखवतोय, हे तुम्हाला मान्य आहे का?” असा सवाल राज ठाकरेंनी हा व्हिडीओ दाखवून उपस्थित केला.
काय आहे या व्हिडीओमध्ये?
हा व्हिडीओ माहीमसमोरच्या समुद्रातला असून तिथे एक अनधिकृत बांधकाम उभं राहिल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. व्हिडीओवरून ते बांधकाम म्हणजे कुणाचीतरी समाधी असल्याचं वाटत असून राज ठाकरेंनी या गोष्टीवर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. तसेच, राज्य सरकारला इशाराही दिला आहे.
“समुद्रात नवीन हाजीअली तयार करत आहेत”
“इथे मकदूम बाबाचा दर्गा आहे. त्याच्यासमोर समुद्रात अनधिकृतरीत्या उभं केलं गेलेलं ते बांधकाम आहे. त्याचे सॅटेलाईट फोटोही मी पाहिले आहेत. तिथे काहीही नव्हतं. माहीम पोलीस स्टेशन जवळ आहे. पण त्यांचं लक्ष नाही. महानगर पालिकेचे लोक फिरत असतात. पण त्यांनी पाहिलं नाही. दिवसाढवळ्या तुमच्या डोळ्यांसमोर समुद्रात नवीन हाजीअली तयार करत आहेत”, असं राज ठाकरे म्हणाले.
“..तर त्याच्याच बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर बांधू”
“प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, पोलीस आयुक्तांना, पालिका आयुक्तांना मी आजच सांगतो. महिन्याभराच्या आत जर त्यावर कारवाई झाली नाही, हे तोडलं गेलं नाही तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर आम्ही उभं केल्याशिवाय राहणार नाही. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ देत.अशा प्रकारे कुणालाही सवलती देत बसाल, कुणाकडेही दुर्लक्ष करणार असाल, तर आमच्याकडेही दुर्लक्ष करा. वाट्टेल ते फाजील चाळे चालू देणार नाही”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी राज्य सरकारसह पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनालाही इशारा दिला आहे.
“हे राज्य जर माझ्या हातात आलं, तर आख्खं राज्य सुतासारखं सरळ करून ठेवीन. परत कुणाची वाकड्या नजरेनं बघायची हिंमत होणार नाही. कुणीही यावं आणि आम्हाला टपली मारून निघून जावं. तुमच्या डोळ्यांदेखत या गोष्टी घडत आहेत. आमचं लक्ष नाही. आम्ही राजकारणात गुंतलोय. महाराष्ट्रातल्या सुज्ञ मुसलमान समाजाला हे मान्य आहे का? कसलीही बांधकामं उभी करायची. कसला दर्गा आहे हा? कुणाची समाधी आहे ती? माशाची?” असा खोचक सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.