महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुन्हा करोनाची लागण झाली आहे. मागील काही काळापासून पायाच्या आजाराने त्रस्त असणारे राज शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. याचदरम्यान ते पुन्हा एकदा करोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यामुळे त्यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आलीय.आधी कोविड डेड सेलमुळे राज ठाकरेंना वैद्यकीय भूल (अॅनेस्थेशिया) देऊ शकत नसल्यामुळे लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी राज ठाकरेंची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलेलं मात्र नंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
शस्त्रक्रिया करण्यापूर्वी २४ तास आधी काही वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याने राज ठाकरे आज लीलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्या वाहनांचा फौजफाटा दुपारी एकच्या सुमारास लीलावती रुग्णालयात पोहोचला आहे. बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रुग्णालयाच्या आवारात होते. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे देखील रुग्णालयात पोहोचले. याच चाचण्यांदरम्यान कोव्हीड डेड सेल्समुळे भूल देता येणं शक्य नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आलीय.
राज ठाकरे यांनी यापूर्वीच पुण्यातील सभेतून पायाच्या दुखण्याबाबत माहिती दिली होती. दोन ते तीन महिने आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचंही त्यांनी सभेतून सांगितलं होतं. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या जाणार आहेत. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी २४ तास आधी रुग्णालयात दाखल होणं आवश्यक असतं, याचं पालन राज ठाकरे यांच्याकडून केलं जात आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपासून मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि अयोध्या दौऱ्यामुळे राज ठाकरे चर्चेत आले होते. मात्र उत्तर प्रदेशमधील भाजपा खासदाराने राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला. उत्तर प्रदेशमध्ये यायचे असेल तर अगोदर उत्तर भारतीयांची माफी मागा अशी मागणी या भाजपा खासदाराने केली होती. त्यानंतर माझा दौरा अयशस्वी होण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली, असा आरोप करत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द केला होता.