मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये प्रश्न घेऊन आलेल्या शेतकऱ्यांबरोबर घडलेला किस्सा सांगत त्याची कारणं सांगितली. यावेळी त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करायला गेले असताना घडलेला एक प्रसंगही नमूद केलं. तसेच मनसे सगळ्या प्रसंगात मदतीला धाऊन जाते. मग मतदानाच्यावेळी हे लोक कुठे जातात असा प्रश्न विचारला. ते रविवारी (११ जून) मुंबईत प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरात मनसे रस्ते, साधन सुविधा विभागाच्या पाचव्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, “मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी रायगडावर गेलो होतो. गडावरून खाली आलो तेव्हा गाडीमध्ये बसताना चार-पाचजण आले. त्यांनी चिपळूनवरून आल्याचं सांगितलं. गेल्यावर्षी कोकणात पुरामुळे नुकसान झालं तेव्हा केवळ मनसेचे कार्यकर्ते मदतीला धावले, इतर कुणीही नाही, असं त्यांनी सांगितलं. बरं झालं भेटलात, कधीतरी आभार मानायचे होते, ते आज मानून टाकतो असं ते म्हटले.”
“…तर मग माझ्याकडे कशाला येता”
“सगळ्या प्रसंगात आपण सगळीकडे धाऊन जातो. सगळीकडे लोक आपल्याकडे प्रश्न घेऊन येतात. मला प्रश्न पडतो, हे मतदानाच्यावेळी कुठे जातात. नाशिकला मला अनेक शेतकरी बांधव भेटायला आले. ते मला अनेक प्रश्न सांगत होते. मी त्यांना त्यांच्या भागातील आमदार, खासदार कोण विचारलं, जिल्हा परिषद कुणाच्या ताब्यात आहे विचारलं. त्यांनी या या पक्षाची असल्याचं सांगितलं. त्यावर जे पिळवणूक करतात त्यांच्याच हातात सत्ता देणार असाल, तर मग माझ्याकडे येता कशाला, असं मी विचारलं,” अशी माहिती दिली.