मुंबई : मुंबईतील मोठे नाले व मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेने काढलेल्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाला असल्याचा आरोप मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे. ठराविक कंपन्यांनाच कामे मिळावीत या पद्धतीने निविदा प्रक्रियेत अटी समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करावी आणि या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
मिठी नदीतील गाळ काढण्याच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप गेल्याच आठवड्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार ॲड. अनिल परब यांनी केला होता. त्यानंतर या प्रकरणात आता मनसेनेही उडी घेतली आहे. नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप बाळा नांदगावकर यांनी गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषद केला. पालिकेच्या पर्जन्यजलवाहिन्या विभागातील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात संगनमत झाल्याचा आरोप त्यांनी कंत्राटदारांची व अधिकाऱ्यांची नावे घेऊन केला.
यावेळी नांदगावकर म्हणाले की, मोठे नाले व मिठीतील गाळ काढण्याठी पालिकेने ठरावीक कंपन्यांना कामे मिळावी यादृष्टीने निविदा काढल्या आहेत. या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या संस्था एकाच कंत्राटदाराच्या आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात एकाच कंत्राटदाराला काम मिळणार आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करू नये, रद्द करावी अशी मागणी नांदगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
मुंबईमधील मोठे नाले, लहान नाले, मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम दोन वर्षांसाठी देण्यात येणार आहेत. त्याकरीता सुमारे २०० कोटीहून अधिक किंमतीच्या निविदा जारी करण्यात आल्या आहेत. साफसफाईचे कंत्राट ठराविक कंत्राटदाराला मिळतील अशा अटी निविदेत घालण्यात आल्या आहेत. आतापर्यंत कोणत्याही कंपन्या निविदा भरू शकत होत्या. मात्र यावर्षी ठराविक यंत्रसामुग्री असलेल्या कंपनीलाच कंत्राट मिळेल अशी अट घालण्यात आली आहे. तसेच काळ्या यादीत असलेल्या कंपन्यांची नावे बदलून नव्या कंपन्या हे काम मिळविण्यासाठी पुढे आल्या आहेत, असाही आरोप नांदगावकर यांनी केला आहे. तसेच या कंपन्यांनी चढ्या दराने निविदा भरल्या असून त्यामुळे पालिकेचे सुमारे २०० कोटींचे नुकसान होईल, असा आरोप नांदगावकर यांनी केला आहे. हा पैसा करदात्या मुंबईकरांचा असून या निविदेची प्रक्रिया त्वरित थांबवून अटी बदलाव्यात व मुंबईकरांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.