मानसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याभोवतीच्या गोतावळ्याच्या राजकारणाला कंटाळलेल्या मनसेच्या चार माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असून भाजपअध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत जानेवारीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते.
माजी आमदार प्रवीण दरेकर, वसंत गिते, रमेश पाटील आणि दीपक पायगुडे यांच्यासह अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असून यातील प्रवीण दरेकर व वसंत गिते यांचे आपण राजीनामे स्वीकारले असून त्यांच्याशी पक्षाच्या कोणीही संबंध ठेवू नयेत असे आदेश राज ठाकरे यांनी जारी केले आहेत. शिवसेनेत असल्यापासून ते मनसेच्या गेल्या सात वर्षांच्या प्रवासात या सर्वानी राज ठाकरे यांना मनापासून साथ दिली होती. तथापि पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत गेल्या काही काळापासून सातत्याने डावलेले जात असल्याची या साऱ्यांची भावना आहे. अलीकडेच मुंबईतील नगरेवकांच्या बैठकीच्यावेळी प्रवीण दरेकर यांचे बंधू व नगरसेवक प्रकाश दरेकर यांना राज यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता.
एकेकाळी ‘माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी’ घेरल्याचे सांगत राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले होते. आज राज यांना घेरलेल्या बडव्यांमुळे वसंत गिते यांच्यासह अनेकांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज अनेकदा पुण्यात गेले परंतु दीपक पायगुडे यांना पक्षाच्या बैठका तसेच पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीपासून लांब ठेवण्यात आले. पायगुडे यांना मानणारा एक मोठा वर्ग मनसेला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असून नाशिक येथे वसंत गिते, ठाकरे आणि चांडक यांच्यासह अनेकजण भाजपत जाण्याच्या तयारीत आहेत. डोंबिवली येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातच माजी आमदार रमेश पाटील यांचा अपमान करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.  
राज यांना सावलीसारखी साथ देणारे प्रवीण दरेकर यांच्याशी पदाधिकाऱ्यांनी संपर्क ठेवू नये असे स्पष्ट आदेश राज यांनी काढल्यानंतर दरकेर यांच्यापुढेही आता पर्याय राहिलेला नसून हे चारही माजी आमदार जानेवारीमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान ज्यांना जायचे असेल त्यांनी मनसेतून तात्काळ निघून जावे या आपल्या भूमिकेवर राज ठाकरे ठाम असून पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या कोणालाही पक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार नाहीत, असे मनसेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader