डोंबिवली पश्चिमेतील कचरा मागील अनेक महिन्यांपासून वेळेवर उचलला जात नसल्याचा आरोप करत येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी दुपारी कचऱ्याने भरलेल्या पेटय़ा पालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयातील प्रभाग अधिकाऱ्याला भेट म्हणून दिल्या. तसेच पेटीतील सर्व कचरा यावेळी कार्यकर्त्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांच्या दालनात पसरवून ठेवला.
अचानक झालेल्या आंदोलनामुळे प्रभाग कार्यालयात धावपळ उडाली. कचराकुंडीत कुजलेला सर्व कचरा ह प्रभाग क्षेत्र अधिकारी लहू वाघमारे यांच्या दालनात आणून त्यांच्यासमोरील टेबलावर व कार्यालयात इतस्त: पसरविण्यात आला.
या कुजलेल्या कचऱ्याचा त्रास जसा पालिका अधिकाऱ्यांना होतो. तसा तो जनता दररोज सहन करीत आहे. मग करदात्या जनतेला होणाऱ्या त्रासाची जबाबदारी कोणाची? कुठे गेला तुमचा कचरा उचलणारा ठेकेदार? असे प्रश्न मनसेकडून उपस्थित करण्यात आले.
डोंबिवली पश्चिमेतील कचराकुंडय़ा पाच ते सहा दिवस उचलल्या जात नाहीत. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गेले दोन महिन्यापूर्वीच पालिकेच्या महासभेत डोंबिवलीतील कचऱ्याचा विषय उपस्थित करण्यात आला होता. यावेळी आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी या प्रभागात कचरा उचलणारी मे. अन्थोनी वेस्ट हॅन्डलिंग कंपनी योग्यरितीने कचरा उचलत नाही. त्याचे काही कामगार न्यायालयात गेले आहेत. पालिका कामगारांतर्फे हा कचरा उचलण्यात येईल असे आश्वासन दिले होते.
आयुक्त रामनाथ सोनवणे यांचा कचरा ठेकेदार आणि पालिका कर्मचाऱ्यांवर कोणताही वचक राहिला नसल्याने हे घाणीचे साम्राज्य पसरले असल्याची टीका मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. डोंबिवली पश्चिमेतील कचरा वेळेत उचलला गेला नाहीतर एक दिवस कल्याण मुख्यालयात कचऱ्याचा मोर्चा नेण्यात येईल असा इशारा मनसेकडून देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा