जलसंधारणाच्या नावाखाली निम्मे मैदान गिळंकृत करायला निघालेल्या मनसेच्या विरोधात शिवसेना ठाकली असून मनसेने पत्रकबाजी, तर मनसेला उघडे पाडण्यासाठी शिवसेनेने बॅनरबाजी सुरू केली आहे. १३ ऑक्टोबर रोजी नरे पार्कवरील प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा असून या मुहूर्तावरच शिवसेना-मनसेत ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पालिकेच्या अर्थसंकल्पात खास निधीची तरतूद करुन दिवंगत नगरसेवक विठ्ठल चव्हाण यांनी नरे पार्कमध्ये अभ्यासिका उभारली होती. तिचे उद्घाटन शिवसेनाप्रमुखांच्या हस्ते झाले होते. आता या मैदानात जलसंधारण प्रकल्प राबविण्याच्या नावाखाली मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी मोठे क्रीडा संकुलच उभारण्याचा घाट घातला आहे. या प्रकल्पानुसार सध्याची अभ्यासिका जमीनदोस्त करून तळमजल्यावर योग केंद्र, संगणक केंद्र, स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, इनडोअर गेम, तर पहिल्या मजल्यावर पॅथॉलॉजी लॅब, बालवाडी, कॉन्फरन्स रुम, उपहारगृह, टेरेस गार्डन यासह मोठा जलतरण तलाव उभारण्यात येणार आहे. त्याशिवाय येथे येणाऱ्यांसाठी मैदानाच्या दुसऱ्या टोकाला २५ वाहने उभी करण्यासाठी वाहनतळही उभारण्याचा मानस आहे. त्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक मैदानाचा गळा घोटला जाणार आहे. शिल्लक राहणाऱ्या मैदानात जलसंधारण प्रकल्प उभा राहणार आहे.
सध्याच्या अभ्यासिकेत बालवाडी, संगणक केंद्र, टायपिंग केंद्र, अभ्यासिका, नृत्य वर्ग भरविण्यात येतात. तसेच आरोग्य शिबीर, चित्रकला स्पर्धा, क्रिकेट स्पर्धाचेही आयोजन केले जाते. पुस्तकपेढीही चालविली जाते. या मैदानात परळ गाव, लालबाग, शिवडी आदी विभागांतील मुले क्रिकेट, फुटबॉल खेळतात. नवा प्रकल्प साकारल्यानंतर मैदानात खेळायला जागाच शिल्लक राहणार नाही. केईएम रुग्णालयात मोफत, तर शेजारीच असलेली नाना पालकर रुग्णसेवा संस्था आणि मारू हॉस्पिटलमध्ये माफक दरात वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. मग मैदानात पॅथॉलॉजी लॅबची आवश्यकता काय आहे, असा प्रश्न शिवसैनिक विचारत आहेत.

Story img Loader