MNS Toll Naka Protest : टोलनाक्यावर करण्यात आलेल्या आंदोलन प्रकरणी मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राज ठाकरेंची पत्रकार परिषद झाल्यानंतर राज्यभरात टोलचं आंदोलन सुरु झालं. त्यानंतर अविनाश जाधव यांना मुलुंड येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर वाशी आणि दहीसर टोलनाक्यावरुनही मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
अविनाश जाधव काय म्हणाले?
पोलीस घटनास्थळी आले तेव्हा अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे की तुम्ही मला ताब्यात घ्यायचं आहे तर घ्या किंवा अटक करायची असेल तर अटक करा पण मला आधी लेखी द्या. आमची काही चूकच नाही. तरीही आम्हाला ताब्यात घेतलं जातं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे सांगितलं ते खोटं आहे का? आम्ही त्याचंच पालन करतो आहोत. तुम्हाला (पोलिसांना उद्देशून) आम्हाला ताब्यात घेण्यासाठी कुणी पाठवलं आहे? आमची चूक काय आहे ते तरी सांगा? अशा प्रश्नांची सरबत्ती अविनाश जाधव यांनी केली.
राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक
राज ठाकरेंच्या आदेशानंतर मुंबईसर राज्यभरातले मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहण्यास मिळालं. मनसैनिकांनी जुन्या मुंबई-पुणे हायवेवर असलेल्या शेडुंग टोल नाका या ठिकाणी आंदोलन सुरु केलं. वाहनं विना टोल सोडण्याची मागणी केली. मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलना दरम्यान चारचाकी वाहनांना टोल न भरता मोफत सोडलं जावं अशीही मागणी केली.
राज ठाकरेंनी काय म्हटलं होतं?
राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरेंचे व्हिडीओ दाखवले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लहान वाहनांना टोलच नाही असं म्हटलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी “देवेंद्र फडणवीस धादांत खोटं बोलतायत, त्यांनी टोलनाक्याबाबत केलेल्या वक्तव्याची शहानिशा आम्ही टोलवर जाऊन करु. टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. त्याची शहानिशा झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार. आमची माणसं टोलनाक्यावर उभी राहतील, फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे लहान वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही, जर याला विरोध केला तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू.” असा इशारा राज ठाकरेंनी दिला होता.